प्रत्येक यशस्वी चित्रपटाची कुंडली एकसारखीच असेल असे नसते याचे सर्वात उत्तम उदाहरण ‘माहेरची साडी’. तुम्हाला आश्चर्य वाटेल आजही या चित्रपटाचे वितरक-निर्माता-दिग्दर्शक विजय कोंडके याच चित्रपटाच्या यशाने असे काही ओळखले जातात की त्यानंतर त्यानी एकाही चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केलेले नाही हे देखिल जाणवले नाही. इतकेच नव्हे तर अलका कुबल आठल्ये आजही माहेरची साडीची सोशिक नायिका म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रात ओळखली जाते. १९९१ च्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाला याच महिन्यात पंचवीस वर्षे पूर्ण झाली. दादा कोंडके यांच्या ग्रामीण विनोदी चित्रपटाची चतुराईने वितरण व्यवस्था सांभाळण्यात यशस्वी ठरलेल्या विजय कोंडके यानी वेगळा अनुभव म्हणून दिग्दर्शनात टाकलेले हे एकमेव पाऊल. ते असे काही यशस्वी ठरले की या चित्रपटाचा खोलवरच्या समाजावरील ठसा पुसण्यासाठी ‘सैराट’ चित्रपट येण्याची वाट पाहावी लागली. ‘माहेरची साडी’च्या कथानकात फारसे वेगळे वा चमकदार असे काहीच नव्हते. सासूकडून होणारा सूनेचा छळ, त्यातून तिचा झालेला दुखद अंत व भाऊ-बहिणीची माया अशी साधारण गोष्ट होती. पण गावागावात हेच घडत असेल तर? म्हणून तर प्रेक्षकांपर्यंत हा चित्रपट पोहोचविण्यात यश आले. ते दिवस विभागावर चित्रपट प्रदर्शित करण्याचे होते. माहेरची साडी सर्वप्रथम इचलकरंजीत झळकला. तेथील महिला प्रेक्षकांपर्यंत हा चित्रपट भावपूर्णरित्या पोहोचला व दृष्टीहीन प्रेक्षकांनीही चित्रपटातील संवादाना दाद दिल्याची बातमी सांगलीच्या वृत्तपत्रात दिली व सांगलीत चित्रपट दाखल केला. तेथे चित्रपट पाहायला गावागावातून प्रेक्षक सायकल, स्कूटर, रिक्षा, एस.टी., टेम्पो अशा मिळेल त्या वाहनाने येतात ही बातमी सातारा येथील वृत्तपत्रांत गाजली. तेथेही चित्रपट हिट ठरला. येथे महिला प्रेक्षकांना लकी तिकीटावर साडी भेट देऊन सत्कार करण्यात येईल असे जाहीर करण्यात आल्यानंतर गर्दीतून वाट काढणे कठीण झाले… असे करत करत हा चित्रपट कोल्हापूर, पुणे, मुंबई असा प्रवास करत महाराष्ट्रात दूरवर पोहोचविण्यात विशेषच यश आले. त्या काळात क्वचितच एखादा मराठी चित्रपट मराठवाडा विदर्भ आणि अन्य राज्यातील मराठी भाषिकांचे चांगेल प्रमाण असलेल्या शहरात झळके. माहेरची साडी मात्र आवर्जुन असा सर्वत्र पोहचला. मार्केटिंग-प्रमोशन अशा शब्दांचा चित्रपट जगतात प्रवेश होण्यापूर्वीच हे सगळे झाले हे विशेष. गंमत म्हणजे या चित्रपटाने मराठी चित्रपट वीस वर्षे मागे नेला असे काही समीक्षकांनी म्हणत चित्रपटात पाहण्यासारखे काहीच नाही अशी टीका केली. पण प्रत्यक्षात मात्र पुढची वीस-पंचवीस वर्षे या चित्रपटाचा ग्रामीण भागातील प्रभाव कायम राहीला. अलकाला प्रचंड सहानुभूतीपूर्वक लोकप्रियता प्राप्त झाली. काही काळ तर चित्रपटाच्या नावात माहेर व पोस्टरभर अलका हे मराठी चित्रपटाच्या यशाचे सूत्र होते. या चित्रपटात विक्रम गोखले, आशालता, अजिंक्य देव, उषा नाडकर्णी, विजय चव्हाण, किशोरी शहाणे, रमेश भाटकर इत्यादींच्याही भूमिका होत्या. तर चित्रपटातील ‘नेसली माहेरची साडी’ हे गाणे त्याकाळात प्रत्येक लग्नसोहळ्यात आवर्जुन वाजविले जाई. तसेच ‘माझं छकुल छकुल’ या गाण्याने प्रत्येक बारसे पार पडत असे. ही गीते जगदिश खेबुडकर यांनी लिहिली होती, तर अनिल मोहिले यांचे त्यांना संगीत होते. माहेरची साडीमधील सोशिक नायिकेच्या भूमिकेसाठी विजय कोंडके याना भाग्यश्री पटवर्धन हवी होती. त्यासाठी त्यानी बराच प्रयत्न देखिल केला. पण ती हो म्हणेना म्हणूनच त्यानी अलकाची निवड केली. त्यांची ही निवड चित्रपट, अलका आणि त्यांच्या पत्थ्यावर पडली…
दिलीप ठाकूर
संग्रहित लेख, दिनांक 26th Aug 2016 रोजी प्रकाशित
फ्लॅशबॅक : माहेरची साडीचे अश्रूपूर्ण धुवाधार यश
'नेसली माहेरची साडी' हे गाणे त्याकाळात प्रत्येक लग्नसोहळ्यात आवर्जुन वाजविले जाई.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 26-08-2016 at 01:05 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maherchi sadi marathi movie