दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूचे वडील व तेलुगु सुपरस्टार कृष्णा घट्टामनेनी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने १५ नोव्हेंबरला निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. १३ नोव्हेंबरला हैदराबादमधील रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांच्या पार्थिवावर कुटुंबीय व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कृष्णा घट्टामनेनी यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात आले आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकार, महेश बाबूचे कुटुंबीय व चाहत्यांनी कृष्णा घट्टामनेनी यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करत आहेत. याच दरम्यानचा महेश बाबूचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वडिलांना शेवटचा निरोप देताना महेश बाबू भावूक झाला. महेश बाबू व त्याच्या कुटुंबियांना अश्रु अनावर झाले.
हेही वाचा >> आलिया-रणबीरच्या मुलीचं नाव ठरलं, ऋषी कपूर यांच्याशी असणार खास कनेक्शन
हेही पाहा >> Photos: “बॉलिवूडमधील सगळ्यात Fit अभिनेत्री कोण?”, सारा खानचं नाव घेत शुबमन गिलच झाला क्लीन बोल्ड!
कृष्णा घट्टामनेनी यांचं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील योगदान फार मोठं आहे. छोट्या भूमिका साकारत अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केलेल्या कृष्णा यांनी ३५० चित्रपटांत काम केलं होतं. पाच दशकं चित्रपटसृष्टीवर राज्य करणाऱ्या कृष्णा यांनी १९६१ मध्ये कलाविश्वात पदार्पण केलं. १९६५ साली प्रदर्शित झालेल्या ‘थेने मनसुलु’ या चित्रपटात ते पहिल्यांदाच मुख्य नायकाची भूमिका साकारताना दिसले. अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या तेलुगू सुपरस्टार कृष्णा यांच्यावर चाहतेही भरभरुन प्रेम करायचे. त्यांच्या जाण्याने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा >> Video : लतिका शूटिंगसाठी ट्रक चालवायला गेली अन्…; ‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील व्हिडीओ व्हायरल
वडिलांवर बायोपिक बनवण्याची इच्छा महेश बाबूने एका मुलाखतीत व्यक्त केली होती. त्याने वडील कृष्णा यांच्यासह जवळपास २५ चित्रपटांमध्ये काम केलं होतं. बालकलाकार म्हणून महेश बाबूने वडिलांसह स्क्रीन शेअर केली होती. या वर्षाच्या सुरुवातीलाच महेश बाबूच्या भावाचं तर सप्टेंबर महिन्यात आई इंदिरा देवी यांचं निधन झालं होतं.