Makar Sankranti 2023: दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू सोशल मीडियावर काही ना काही कारणाने नेहमीच चर्चेत असतो. अनेकदा तो त्याच्या कामाचे आणि रोजच्या जीवनातील अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असतो. तसेच तो त्याची मुलगी सिताराचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतो. तिचे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरलही होतात. आताही सिताराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. जो तिची आई म्हणजेच महेशबाबूची पत्नी- अभिनेत्री नम्रता शिरोडकरने शेअर केला आहे.
आज देशभरात मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अशात मराठी कुटुंबातून आलेली नम्रता शिरोडकर मकर संक्रांतीचा सण साजरा करत आहे. तिने तिच्या मुलीचा एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महेश बाबूची लेक सिताराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
आणखी वाचा- “महेश आयुष्यात आला आणि…” अखेर नम्रता शिरोडकरने सांगितले चित्रपटसृष्टीपासून लांब जाण्यामागचे कारण
महेश बाबूची लेक सिताराने मराठीतून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नम्रता शिरोडकरने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये सितारा, “मकर संक्रांतीच्या शुभेच्छा! तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.” असं बोलताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सिताराने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला असून त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना नम्रताने लिहिलं, “मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.”
आणखी वाचा- मानधन, एकूण संपत्ती आणि बरंच काही… महाराष्ट्राचा जावई महेश बाबूबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?
दरम्यान नम्रता शिरोडकरने महेश बाबूशी लग्न केल्यानंतर चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला. ती सोशल मीडियावर मात्र बरीच सक्रिय असते. नम्रता शिरोडकर दाक्षिणात्य संस्कृतीबरोबर आपल्या महाराष्ट्रातील संस्कृतीचाही खूप आदर करते. तिने दोन्ही संस्कृतींचा मेळ उत्तम साधला असल्याचं नेहमीच दिसून येतं. तिची दोन्ही मुलं दाक्षिणात्य भाषांबरोबरच मराठीही उत्तमप्रकारे बोलताना दिसतात आणि मराठी सणही मोठ्या उत्साहाने साजरे करताना दिसतात.