दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूच्या वडिलांना प्रकृतीच्या कारणास्तव हैदराबादमधील रुग्णालयात दाखल केलं असल्याची माहिती मिळत आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे इस्पितळात दाखल केले गेले आहे. परंतु, त्यांच्या कुटुंबियाकडून याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
१३ नोव्हेंबरला हैदराबादमधील ‘कॉन्टिनेंटल’ रुग्णालयात महेश बाबूचे वडील तपास करण्यासाठी गेले होते. परंतु, श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीमुळे त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. महेश बाबूचे वडील कृष्णा हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. ते ८० वर्षांचे आहेत. गेल्या सहा दशकांपासून ते मनोरंजन विश्वात कार्यरत असून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील त्यांचं योगदान मोठं आहे. त्यांनी जवळपास ३५० हून अधिक चित्रपटांत काम केलं आहे. अभिनयाबरोबरच त्यांनी उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शनही केलं आहे. २००९ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
हेही वाचा >> सिद्धांत सूर्यवंशीच्या निधनानंतर पत्नीची पहिली पोस्ट, भावूक होत म्हणाली, “तू मला कायमच…”
महेश बाबू व त्याच्या कुटुंबियांनी गेल्या काही काळात त्यांच्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे. महेश बाबूची आई व कृष्णा यांच्या पत्नी इंदिरा देवी यांचे गेल्याच महिन्यात निधन झाले. या वर्षाच्या सुरुवातीलाच महेश बाबूने त्याच्या भावाला तर कृष्णा यांनी आपल्या मुलाला गमावले. त्यामुळे सध्याचा काळ महेश बाबूसह त्याच्या कुटुंबियांसाठीही कठीण आहे.
हेही पाहा >> Photos: नऊवारी साडीतील मराठमोळा लूक ते गॉगलची फॅशन, प्राजक्ता माळीचे बालपणीचे फोटो पाहिलेत का?
महेश बाबू निराशाजनक परिस्थितीतून जात असला तरी त्याच्या चाहत्यांसाठी तो मनोरंजनाची मेजवानी घेऊन सज्ज आहे. महेश बाबू ‘सारकारू वारी पाता’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २३० कोटींचा गल्ला जमवला होता. प्रसिद्ध दिग्दर्शक राजामौली यांच्या आगामी चित्रपटातही महेश बाबू दिसणार आहे.