मुंबईवर झालेल्या २६ /११ च्या दहशतवादी हल्ल्याला १० वर्ष उलटून गेली आहेत. या हल्ल्यात दहशतवाद्यांशी दोन हात करतांना मेजर संदीप उन्नीकृष्णन शहीद झाले. या हल्ल्यानंतर २६/११ चा हिरो अशी त्यांची स्वतंत्र ओळखही निर्माण झाली. त्यांची ही शौर्यगाथा लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. संदीप उन्नीकृष्णन यांच्यावर आधारित लवकरच बायोपिकची निर्मिती करण्यात येणार आहे.
मेजर संदीप उन्नीकृष्णन हे राष्ट्रीय सुरक्षा पथकामध्ये (एनएसजी) कमांडो म्हणून कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आलं. त्यांचा जीवनप्रवास उलगडण्यासाठी ‘मेजर’ या बायोपिकची निर्मिती करण्यात येणार आहे. हा चित्रपट हिंदी आणि तेलुगु अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Honoured to bring you the story of our National hero – Major Sandeep Unnikrishnan…
Sending my best wishes to @AdiviSesh, director @sashikirantikka, team @GMBents, @AplusSMovies… & Congratulations @SonyPicsIndia on your debut Telugu production#MajorTheFilm pic.twitter.com/BZf4gSE1Rn— Mahesh Babu (@urstrulyMahesh) February 27, 2019
अभिनेता अदिवी सेश हा या चित्रपटात मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या भूमिकेत झळकणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूच्या जीएमबी इन्टरटेंन्मेंट या निर्मिती संस्थेमध्ये तयार होणाऱ्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनाच्या जबाबदारी शशी किरण टिक्का यांनी स्वीकारली आहे. शशी किरण टिक्का यांनी यापूर्वी गोदाचारीचं दिग्दर्शन केलं आहे. सोनी पिक्चर्स या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच तेलुगु चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या चित्रपटाचं यावर्षी चित्रीकरण सुरु होणार असून पुढील वर्षी तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दरम्यान, अदिवी सेश याने यापूर्वी ‘बाहुबली’ या चित्रपटामध्ये काम केलं आहे. त्यासोबतच ‘बागी २’ या चित्रपटाची पटकथादेखील लिहीली आहे. मुंबईवरील हल्ल्यावेळी ताज पॅलेस हॉटेलमध्ये दहशतवाद्यांचा मुकाबला करताना मेजर संदीप हे शहीद झाले होते. यावेळी त्यांनी दाखविलेल्या शौर्याबद्दल त्यांना अशोकचक्र सन्मान प्रदान करण्यात आलं आहे.