कलाकार चाहत्यांच्या प्रेमाविना अपूर्ण आहे. आपण जे काही आहोत ते मायबाप प्रेक्षकांमुळेच आहोत हे अनेकदा कलाकार बोलूनही दाखवतात. हेच चाहते कलाकारांवर असलेल्या प्रेमापोटी वाट्टेल ते करतात. आपल्या आवडत्या कलाकाराची एक झलक पाहण्यासाठी, त्याचा ऑटोग्राफ मिळवण्यासाठी दीर्घ प्रतिक्षा करण्याची तयारीही त्यांची असते. दाक्षिणात्य चित्रपटांतील सुपरस्टार महेश बाबूचे चाहते भारतातच नव्हे तर जगभरात आहेत. महेश बाबूने नुकतीच अशा एका चाहतीची भेट घेतली आणि या भेटीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेल्या महेश बाबूची भेट घेण्यासाठी १०६ वर्षांची वृद्ध महिला सेटवर पोहोचली. रेलांगी सत्यवती असं त्यांचं नाव असून महेश बाबूला भेटण्यासाठी त्या राजामुंड्री या गावातून आल्या होत्या. त्यांची ही जिद्द पाहून वयोवृद्ध सत्यवती या महेश बाबूच्या सर्वांत तरुण चाहत्या आहेत असं म्हणायला हरकत नाही.
‘माझी पिढी सोडता, दुसऱ्या पिढीतून अशा प्रकारचं प्रेम मिळणं म्हणजे माझ्यासाठी ही अविस्मरणीय अनुभव आहे. चाहत्यांच्या प्रेमाने मी नेहमीच भारावून जातो पण सत्यवती यांनी माझं मन जिंकलं. मला भेटून त्या खूश झाल्या पण खरं तर त्यांच्यापेक्षा जास्त आनंद मला झाला,’ अशी पोस्ट त्याने इन्स्टाग्रामवर लिहिली.

महेश बाबू सध्या त्याच्या आगामी ‘महर्षी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने या चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला होता. उत्तम कथानकासोबतच मनोरंजनपूर्ण असे महेश बाबूचे चित्रपट असतात. बॉक्स ऑफीसवर त्याच्या बहुतांश चित्रपटांनी बक्कळ कमाई केली आहे. महेश बाबूने बॉलिवूडमध्ये पदार्पण करावं अशी लाखो चाहत्यांची इच्छा आहे. त्याच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत काही दिवसांपूर्वी जोरदार चर्चासुद्धा रंगल्या होत्या. मात्र बॉलिवूड चित्रपटात भूमिका साकारण्याचा अद्याप त्याचा विचार नसल्याचं पत्नी नम्रता शिरोडकरने स्पष्ट केलं.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahesh babu met with 106 year old fan and shared post on instagram
Show comments