महेश बाबू(Mahesh Babu) हा तेलुगू चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याच्या सहज अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. अभिनयाबरोबरच अनेकदा तो त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत येतो. आता अभिनेत्याने त्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या पत्नीसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याची ही पोस्ट चाहत्यांसह कलाकारांचेही लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
महेश बाबू काय म्हणाला?
महेश बाबूने सोशल मी़डियावर पत्नी नम्रता शिरोडकरबरोबरचा एक फोटो शेअर केला. या फोटोत दोघेही हसत असल्याचे दिसत आहे. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद आहे. हा फोटो शेअर करत अभिनेत्याने लिहिले, “तू, मी आणि सुंदर २० वर्षे… मी कायम तुझ्याबरोबर आहे”, असे लिहित लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महेश बाबू व नम्रता शिरोडकरच्या लग्नाला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. १० फेब्रुवारी २००५ ला त्यांनी लग्नगाठ बांधली होती. त्यांची भेट ‘वामसी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे.
महेश बाबूच्या या पोस्टवर चाहत्यांसह कलाकारांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. २००१ साली प्रदर्शित झालेल्या ‘मुरारी’ चित्रपटात महेश बाबूबरोबर काम करणाऱ्या सोनाली बेंद्रेने कमेंटमध्ये काही इमोजी शेअर केल्याचे दिसत आहे, तर अभिनेत्री ट्विंकल खन्नाने हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. अनेक चाहत्यांनी हॅपी ॲनिव्हर्सरी तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करीत या लोकप्रिय जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/image_5ffc67.png)
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/image_a09693.png)
नम्रता शिरोडकरची बहीण अभिनेत्री शिल्पा शिरोडकर बिग बॉसच्या १८ व्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. १०२ दिवस ती या शोमध्ये राहिली. खेळाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात अभिनेत्रीला घराबाहेर पडावे लागले. ती जरी या शोची विजेती झाली नसली तरी अभिनेत्रीच्या खेळाची चर्चा मात्र झाल्याचे पाहायला मिळाले. ती घरात असताना महेश बाबूने तिला पाठिंबा देण्यासाठी सोशल मी़डियावर एखादी पोस्ट शेअर का केली नाही, असे प्रश्न विचारण्यात येत होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शिल्पा शिरोडकरने या चर्चांवर मौन सोडले. तिने म्हटले की, सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवरून नात्यांची किंमत केली जाऊ नये. मी बिग बॉसच्या घरात नम्रताची बहीण किंवा महेश बाबूची मेहुणी म्हणून गेले नव्हते. मी जशी आहे, त्यासाठी गेले होते. तो लोकप्रिय आहे, सुपरस्टार आहे म्हणून त्याने माझ्या करिअरचा भाग होणे गरजेचे नाही. महेश आणि नम्रता फार व्यक्त होत नाहीत. पण, हे जग त्यांना गर्विष्ठ हे लेबल पटकन लावते. महेश जास्त व्यक्त होत नसला तरी तो खूप चांगला व्यक्ती आहे. जर कोणत्याही गोष्टीची गरज असेल, तेव्हा तो मदतीला येतो, असे म्हणत तिने यावर स्पष्टीकरण दिले होते.