१९७४ ते २०१५ इतका मोठा काळ जो माणूस सिनेमासृष्टीला आणि त्याच्या वैचारिक-सामाजिक कार्यामुळे सगळ्या समाजाला व्यापून उरला आहे त्याचं त्याच्याच क्षेत्रात पुनरागमन होतं आहे असं म्हणण्यात खरं म्हणजे काही तथ्य नाही. पण महेश भट्ट यांच्याबाबतीत तसं होत नाही. ‘अर्थ’, ‘डॅडी’, ‘सारांश’, ‘जख्म’सारखे संवेदनशील विषयांवरचे चित्रपट देणारा दिग्दर्शक इतक्या वर्षांनंतर जेव्हा माझ्याकडे एक कथा आहे.. असं म्हणतो तेव्हा मोहित सुरीसारख्या नव्या दिग्दर्शकापासून ते महेश भट्ट यांचे सिनेमे पाहत मोठे झालेली पिढीही उत्साहाने त्यांची कथा ऐकवण्यासाठी पुढे सरसावते. ‘हमारी अधुरी कहानी’ या चित्रपटाच्या बाबतीत नेमकं तेच झालं आहे. दिग्दर्शक म्हणून महेश भट्ट यांनी आपला कॅमेरा रोल करणं कधीच थांबवलं आहे. त्या भूमिकेत पुन्हा शिरायचं नाही हा त्यांचा आग्रह कायम आहे, मात्र त्यांची लेखणी अधूनमधून लिहिती होते. बऱ्याच वर्षांनंतर मला स्वत:ला ‘हमारी अधुरी कहानी’सारखी एक संवेदनशील कथा लिहिता आली आहे. पण माझी ही कथा पडद्यावर येताना नव्या पिढीचे रंग घेऊन उतरली आहे, असे सांगत महेश भट्ट ‘हमारी अधुरी कहानी’मागची कथा सांगायला सुरुवात करतात.
‘आयुष्यात आपण एका अशा टप्प्यावर येऊन पोहोचतो जेव्हा आपल्याच आयुष्याकडे एका चरित्रकाराच्या नजरेने पाहण्याची दृष्टी आपल्याला प्राप्त होते. आयुष्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन असणं आणि स्वत:ला आरशात पाहणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ‘जख्म’ असेल किं वा ‘सारांश’ असेल, हे चित्रपट म्हणजे माझ्या व्यक्तिगत जीवनाच्या छोटय़ाशा खिडकीतून पाहिलेल्या समाजावर आधारलेले होते. ते कुठे तरी माझ्या व्यक्तिगत दृष्टिकोनातून मांडलेले चित्रपट होते. पण जसजसा काळ पुढे सरकतो तसं तुम्हाला लक्षात येतं की, आपल्या दृष्टिकोनाची ती खिडकी म्हणजे एका छोटय़ाशा भिंगासारखी आहे. असे अनेक दृष्टिकोन, विचार या विश्व नावाच्या अवकाशात आहेत. हे आपल्या आजूबाजूचे समज, विचार जेव्हा तुम्हाला तुमच्या कथेत उतरवता येतात तेव्हा त्याचा आयाम वेगळा असतो. अत्यंत सहजतेने तुमची कथा ही सगळ्यांची कथा होऊन जाते. ‘हमारी अधुरी कहानी’ची कथा ही अशी जन्माला आली आहे’, अशा शब्दांत त्यांच्या सिनेमाची मीमांसा ऐकताना बदलत्या सिनेमाचे प्रतीक म्हणजे महेश भट्ट ही त्यांची इंडस्ट्रीतील ओळख किती वास्तव आहे ते लक्षात येतं.
‘हमारी अधुरी कहानी’ हा चित्रपट वसुधा या मध्यमवयीन विवाहित स्त्रीची कथा सांगतो. वसुधाची कथा ज्या विचारातून जन्माला आली ते विचार खरं म्हणजे ते संवाद हे खाणीवर काम करणाऱ्या मजूर महिलांचे आहेत, असं ते सांगतात. ‘मांग मेरी सिंदूर तुम्हारे नाम का? कोख मेरी, खून मेरा, दुध मेरा, बच्चा तुम्हारे नाम का? हे संवाद माझे नाहीत. असे काही लिहिण्याची ताकद माझी नाही. मजूर स्त्रियांबरोबर संवाद साधताना त्यांनी तक्रार केली होती. आम्हाला मुक्ती हवी आहे. दिवसभर काम करून घरी आल्यानंतर आमचा नवरा आम्हाला मारतो. लाथाडतो. तरीही आम्ही त्यांना सांभाळतो. ‘करवा चौथ’सारखं व्रत करून पुन्हा त्याच्याकडेच ‘सदा सौभाग्यवती’ राहण्याचा आशीर्वाद मागतो. ही कसली परंपरा आहे, हा प्रश्न त्या स्त्रियांनी विचारलेला आहे. पण हा प्रश्न फक्त माझ्या घरात काम करणारी मोलकरीण विचारते असं नाही. आज जीन्स-कुर्ता घालून फिरणारी अत्याधुनिक स्त्रीसुद्धा हाच प्रश्न विचारते. याचाच अर्थ, विवाहाचा हा संस्कार स्त्रीच्या रोमारोमांत इतका भिनला आहे. सीता आणि सती दोघींची गोष्ट माहिती असलेल्या भारतीय स्त्रीला राधेचा रंगही हवा आहे ना! तिच्यात राधाही आहे, पण तिला हवं असलेलं प्रेम मागणंही ती विसरून गेली आहे. या पाश्र्वभूमीवर वसुधासारखी आजची स्त्री एका क्रांतिकारक निर्णयापर्यंत कशी पोहोचते, हा ‘हमारी अधुरी कहानी’चा विषय असल्याचं महेश भट्ट यांनी सांगितलं. ही कथा भारतीय स्त्रीची असली तरी हा विषय वैश्विक आहे, असं ते आग्रहाने मांडतात. अमेरिका आणि इंग्लंडमधल्या स्त्रीलासुद्धा पुरुषांच्या या अधिकारशाहीला सामोरं जावंच लागतं, असं सांगणाऱ्या भट्टसाबना आपल्याच दोन नायिकांची तुलना यानिमित्ताने करावीशी वाटते.
‘अर्थ’मधली शबाना आझमी नवरा दुसरी पत्नी करतो तेव्हा त्याच्याशी भांडते, आपलं लग्न टिकवण्याचा हरएक प्रयत्न करते. मात्र त्या नात्यातून बाहेर पडल्यानंतरही ती नवऱ्यालाच काय, तिच्यावर प्रेम करणाऱ्यालाही अडवते. ती पुन्हा कोणालाच आपल्यावर अधिकार गाजवू देत नाही. ‘अर्थ’ची नायिका समाजाच्या दृष्टीने क्रांतिकारी होती. आजही ती अनेक स्त्रियांना प्रेरित करते. पण ते १९८३ साल होतं. आज २०१५ मध्ये जगताना विचार करून बघा.. त्याच स्त्रीची समज खूप वेगळी आहे. ‘अर्थ’मध्ये जे शबाना करते ते ‘हमारी अधुरी कहानी’मध्ये विद्या बालनने रंगवलेली वसुधा करूच शकत नाही.. म्हणणाऱ्या महेश भट्ट यांचं या दोन चित्रपटांदरम्यान दिग्दर्शक म्हणून झालेलं वैचारिक स्थित्यंतर पाहणं हेही त्यांच्या चाहत्यांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.
‘हमारी अधुरी कहानी’सारखा विषय आत्ताच्या प्रेक्षकांना नक्की आवडेल, असं त्यांना वाटतं. ‘आशिकी २’ जेव्हा हिट झाला तेव्हा मी मोहितला म्हटलं की आजही थिएटरमध्ये येऊन माझी गोष्ट पाहणारा, भावनाशील होऊन रडणारा, पडद्यावरच्या विश्वात हरवणारा माझ्या चित्रपटांचा प्रेक्षक अजूनही आहे, हे मला पटलं. तरुण पिढी असली म्हणून काय झालं, शेवटी त्यांनाही मन आहे, त्यांच्याही भावना तशाच आहेत. तेव्हाच ‘हमारी अधुरी कहानी’चा विषय मोहितला सांगितला. अर्थात, ती कथा दिग्दर्शक म्हणून मांडताना मोहितने त्याच्या दृष्टिकोनातून मांडली आहे हे सांगायलाही ते विसरत नाहीत. ‘आशिकी २’सारख्या चित्रपटांना जेव्हा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो, ‘हमारी अधुरी कहानी’च्या गाण्यांना जो वन्स मोअर मिळतो आहे हे पाहिल्यावर समाजाचा वैचारिक स्तर बदलला आहे हे लक्षात येतं असं ते म्हणतात. एखाद्या समाजाची मूल्ये काय आहेत हे जोखायचं असेल तर त्या समाजाच्या कलेकडे पाहिलं जातं. कारण समाजात जेव्हा परिवर्तन होतं तेव्हा पहिल्यांदा काय बदलत असेल तर त्यांची इतरांना गोष्ट सांगण्याची पद्धत बदलते. त्यांची कला बदलते, त्यांचा सिनेमा बदलतो. आज ज्या चित्रपटांना यश मिळतं आहे ते पाहिलं तर तुम्हाला हे सहज लक्षात येईल, असं ते सांगतात.
‘जख्म’ हा दिग्दर्शक म्हणून माझा शेवटचा चित्रपट होता, असं ते म्हणतात. महेश भट्ट यांच्याबरोबर काम करायला आजच्या पिढीचे कलाकार तरसतात, असं त्यांना ऐकवल्यावर त्यांनी माझं काम पाहिलं आहे त्यामुळे त्यांना तशी उत्सुकता वाटणं साहजिक आहे. पण काळ बदलतो तसे आजूबाजूचे बदल हे कलाकार म्हणून आपण स्वीकारले पाहिजेत. माझ्या चित्रपटांचा काळ निघून गेला आहे. मला जे काही सांगायचं होतं ते अगदी वेगवेगळ्या चित्रपटातून वेगवेगळ्या पद्धतीने मांडून संपलं आहे. आता लोकांना देण्यासारखा विचार, गोष्ट माझ्याकडे नाही. त्यामुळे समोरचे आपल्याला ‘वन्स मोअर’ म्हणत असतानाच तिथे थांबणं आपल्याला योग्य वाटतं असं ते म्हणतात. निदान, आलियासाठी तरी दिग्दर्शन करावं असं वडील म्हणून वाटत नाही का, असं विचारल्यावर आलिया २२ व्या वर्षी इंडस्ट्रीत ज्या पोझिशनला पोहोचली आहे तिथे गेल्या पन्नास वर्षांत आपल्याला पोहोचता आलेलं नाही. त्यामुळे तो हव्यास नको. उलट, नवा मोसम आल्यानंतर नवी झाडं उगवणार, नवी पालवी फुटणार, त्यातला आनंद घेतलाच पाहिजे, असं ते म्हणतात. ‘हमारे आंगन मे भी पेड थे कभी..’ असं म्हणत उसासा टाकण्यापेक्षा मोहित, इम्रान, विद्या, राजकुमारसारख्या आजच्या तरुण चित्रपटकर्मीबरोबर ‘हम ही हम है तो क्या हम है.. तुम्ही तुम हो तो क्या तुम हो.’ या वृत्तीने एकत्र वाटचाल करण्यात मजा आहे असं भट्टसाब हसत सांगतात.

Story img Loader