गेल्या काही दिवसांपासून दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते महेश मांजरेकर यांच्या ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ या चित्रपटावरून सुरू असलेला वाद अखेर शमला आहे. खुद्द महेश मांजरेकर यांनीच यासंदर्भात जाहीर निवेदन दिलं आहे. यामध्ये महेश मांजरेकरांनी आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. तसेच, ज्या दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला होता, ती दृश्य, तसेच आदी प्रदर्शित करण्यात आलेला ट्रेलर देखील काढून टाकण्यात आल्याचं त्यांनी या निवेदनाद्वारे जाहीर केलं आहे. तसेच, लोकांनी थिएटरमध्ये जाऊन पूर्ण चित्रपट पाहावा आणि आपला अभिप्राय कळवावा, असं देखील या निवेदनात मांजरेकरांनी म्हटलं आहे.
“सेन्सॉर बोर्डानेही याला ‘ए’ प्रमाणपत्र दिलंय”
कुणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नसल्याचं मांजरेकर या निवेदनात म्हटले आहेत. “नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा या चित्रपटाचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर समाजातील बऱ्याच स्तरांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. हा चित्रपट १८ वर्ष वयोगटापुढील प्रेक्षकांसाठीच असल्याने सेन्सॉर बोर्डानेही याला ‘ए’ प्रमाणपत्र दिलं आहे. या चित्रपटाच्या प्रोमोमधील काही दृश्यांवर समाजातील काही घटकांनी आक्षेप घेतला असला, तरी कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा मुळीच हेतू नाही”, असं त्यांनी म्हटलं आहे.
ट्रेलर समाजमाध्यमातून हटवला
दरम्यान, आक्षेप घेण्यात आलेला ट्रेलर समाजमाध्यमातून काढून टाकल्याचं मांजरेकरांनी या निवेदनात जाहीर केलं आहे. “समाजातून उमटणाऱ्या प्रतिक्रियांचा मान राखत आम्ही नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चाच्या प्रोमोमधून आक्षेपार्ह वाटणारी दृश्य काढून टाकली आहेत. नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चाचा जुना ट्रेलर ज्या सोशल मीडिया प्लॅटफर्म्सवर प्रदर्शित करण्यात आला होता, त्या सर्व ठिकाणांहूनही काढण्यात आला असून सुधारीत प्रोमो सर्वांना पाठवण्यात येत आहे. जुना प्रोमो त्वरीत काढून नवीन प्रकाशित करण्याच्या सूचनाही संबंधित माध्यमांना करण्यात आल्या आहेत.
नाय वरनभात लोन्चा…चित्रपटावरील वादावर महेश मांजरेकरांनी सोडलं मौन; म्हणाले…
“तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो”
“चित्रपटाच्या निर्मितीसंस्थेपासून लेखक-दिग्दर्शक, कलावंत आणि तंत्रज्ञ असे आम्ही सर्वजण तमाम स्त्रियांचा मनापासून आदर करतो. समाजातील सर्व महिलांबद्दल आमच्या मनात आदराची भावना आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा चुकीचा संदेश समाजामध्ये जाणार नाही, याचा कटाक्षाने प्रयत्न करण्यात आला आहे. असे असले, तरी नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चाच्या प्रोमोधील काही दृश्यांतून कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर आम्ही त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आक्षेपार्ह वाटणारी दृश्य केवळ प्रोमोमधूनच नव्हे, तर मुख्य चित्रपटातूनही वगळण्यात आली आहेत. सेन्सॉरने ए सर्टिफिकेट दिल्यानंतरही जी दृश्य संवेदनशील वाटतात आणि भविष्यात ज्याचा त्रास होऊ शकतो असे वाटते ती दृश्य आम्ही चित्रपटातूनही वगळत आहोत”, असं ते या निवेदनात म्हणाले आहेत.
“नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चाची प्रसिद्धी सुरू करण्यात आली त्या क्षणापासून हा चित्रपट केवळ प्रौढांसाठीच असल्याचं आम्ही प्रत्येक वेळी सांगितलं आहे. तशा आशयाची ओळही सिनेमाच्या पोस्टरवर लिहिण्यात आली आहे. अठरा वर्षांखालील प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी येऊ नये, याची आम्ही योग्य ती काळजी घेतली आहे. जे यात दाखवण्यात आलेली वास्तवता पाहण्यास सक्षम आहेत, यातील दृश्यांचं गांभीर्य लक्षात घेऊ शकतात, यातील दाहकता सहन करू शकतात अशा प्रेक्षकांनीच हा चित्रपट पाहावा अशी विनंतीही आम्ही सातत्याने केली आहे. हा सिनेमा विषयाच्या दृष्टीने थोडासा जड असून सर्वसामान्य चित्रपटांसारखा नसल्याची माहितीही आम्ही देत आलो आहोत”, असं मांजरेकरांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
“पूर्ण सिनेमा पाहिल्यावर अभिप्राय कळवा”
प्रेक्षकांनी पूर्ण सिनेमा पाहिल्यानंतर त्यांचा अभिप्राय कळवावा, अशी अपेक्षा मांजरेकरांनी या निवेदनाच्या शेवटी व्यक्त केली आहे. “मुंबईत तीन दशकांपूर्वी उद्भवलेली परिस्थिती आणि त्यातील दाहकता दाखवण्याचा प्रयत्न या सिनेमाद्वारे केला आहे. तरीही काही गोष्टी काहींना सहन करणे किंवा बघणे चुकीचे वाटत असेल, त्यांच्यासाठी ही दृश्यं सिनेमातूनही पूर्णपणे काढण्यात आली आहेत. नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चाच्या माध्यमातून एक वास्तववादी सिनेमा आपल्या भेटीला आणला आहे. १८ वर्षांवरील प्रत्येकानं सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा बघावा. सिनेमा पूर्ण पाहिल्यावर आपला अभिप्राय कळवावा”, असं यात म्हटलं आहे.