मुंबई पोलीस दलातील प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे हे दोघेही पोलीस आणि गुन्हेगारी वर्तुळात तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ म्हणून प्रसिद्ध. हे दोघेही बहुचíचत आणि वादग्रस्त. निर्माते-दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्या आगामी ‘रेगे’ या चित्रपटात या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांच्या व्यक्तिरेखा त्यांच्या नावासह पाहायला मिळणार आहेत. चित्रपटात अभिनेते महेश मांजरेकर यांनी ‘प्रदीप शर्मा’ची, तर पुष्कर श्रोत्री ‘सचिन वाझे’च्या भूमिकेत दिसतील.
‘रेगे’ चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटात वास्तवातील पोलीस अधिकारी त्यांच्या खऱ्या नावांसह आणि त्यांनी केलेल्या कामासह पाहायला मिळणार आहेत. गुन्हेगारी आणि पोलीस विश्व, गुन्हेगारी विश्वाच्या जाळ्यात गुरफटलेली तरुणाई, याचे सामाजिक व कौटुंबिक परिणाम, गुन्हेगारी विश्वाकडे वळणाऱ्या तरुणाईची मानसिकता, अशा विविध पैलूंवर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे.
पोलीस आणि गुन्हेगारी विश्वात सापडलेल्या तरुणाची भूमिका आरोह वेलणकर याने साकारली आहे. ‘बालक पालक’ आणि ‘टाईमपास’ या यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. चित्रपटात प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे या वास्तवातील पोलीस अधिकाऱ्यांची नावे असलेल्या व्यक्तिरेखा असल्या तरीही हा चित्रपट या दोघांशी संबंधित असलेल्या प्रकरणांवर आधारित नाही. कोणाही पोलीस अधिकाऱ्यांच्या तसेच सर्वसामान्यांच्या आयुष्यात घडू शकेल, अशी कथा यात आहे. या दोघांच्या वास्तवातील नावांचा चित्रपटासाठी केवळ आधार म्हणून उपयोग करण्यात आला आहे, असा दावा चित्रपट सूत्रांनी केला आहे.
सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय घरातील तरुण काही खोटय़ा आणि अवास्तव कल्पनांमुळे गुन्हेगारी विश्वाच्या चक्रात कसा अडकतो, हे यात दाखविण्यात आले आहे. अशा प्रकरणांमध्ये मुलांच्या पालकांचीही भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे ‘तुमचा मुलगा करतो काय?’, ‘तुमच्या मुलाकडे तुमचे नीट लक्ष आहे ना’? असे सवाल उपस्थित करीत पालकांना त्यांच्या मुलाबद्दल नव्याने भान आणून देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा