महेश मांजरेकर यांची घोषणा
पुलंच्या लेखणीतून उतरलेल्या कित्येक व्यक्तिरेखा आजही लोकांच्या मनात घर करून आहेत. ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील त्यांच्या प्रत्येक व्यक्तिरेखेने आपल्याला भुरळ घातली आहे, असे सांगणाऱ्या दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी लवकरच पुलंच्या या वल्ली रुपेरी पडद्यावर आणणार असल्याचे जाहीर केले. ‘नटसम्राट – असा नट होणे नाही’ या चित्रपटाच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात झालेल्या गप्पांदरम्यान मांजरेकरांनी पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्लीं’नी आपल्यावर दिग्दर्शक म्हणून जो प्रभाव टाकला आहे, ते पाहता या चित्रपटातील अठरा वल्लींना तीन भागातील चित्रपटांत रंगवण्याचा मानस व्यक्त केला.
साठ ते ऐंशीच्या दशकात मराठी मनावर अक्षरश: गारूड केलल्या पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकावर आधारित चित्रपट लवकरच घेऊन येत असल्याचे महेश मांजरेकर यांनी जाहीर केले. ‘नटसम्राट’ हे कुसूमाग्रजांच्या लेखणीतून उतरलेले आणि डॉ. श्रीराम लागूंसारख्यांनी रंगभूमीवर जिवंत केलेले नाटकही आपण पाहिले नव्हते. मात्र, हे नाटक वाचल्यानंतर त्यातील भावना काळजाला भिडली. ‘नटसम्राट’ वाचल्यानंतर एका वैभवशाली नाटय़गृहाचे जीर्ण होत जाणे आणि एका नटाची लयाला गेलेली कारकिर्द असा धागा सापडला तेव्हाच या चित्रपटाची कथा लिहून पूर्ण केली, असे महेश मांजरेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. त्याचपध्दतीने रंगभूमीवरील अशा नाटय़कृती, साहित्यकृतींनी आपल्याला भुरळ घातली आहे. ज्यात ‘व्यक्ती आणि वल्ली’सारख्या नाटकाचा समावेश असल्याचेही मांजरेकर यांनी नमूद केले. ‘नटसम्राट’ बेलवलकरांची भूमिका पडद्यावर जिवंत करणारे अभिनेता नाना पाटेकर, मेधा मांजरेकर, सुनील बर्वे, चित्रपटाचे निर्माते विश्वास जोशी आणि ‘झी स्टुडिओ’चे निखिल साने यावेळी उपस्थित होते.
‘समाजात आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या अठरा वल्लींना पुलंनी या ललितगद्य स्वरुपाच्या पुस्तकातून वाचकांसमोर आणल्या होत्या. या वल्लींना नाटकातून जिवंत करण्याचाही प्रयत्न आतापर्यंत अनेकदा झाला आहे. काही वर्षांपूर्वी रत्नाकर मतकरी, चंद्रकांत कुलकर्णी यांनी ‘वल्ली’ नाटय़रुपात गुंफल्या होत्या. आताही चंद्रकांत कुलकर्णी यांच्या दिग्दर्शनाखालील नव्या रुपात त्याचे नाटय़प्रयोग सुरु असून महेश मांजरेकरही त्यात काम करत आहेत. पुलंची ही प्रत्येक वल्ली म्हणजे एक स्वतंत्र विषय आहे. त्यामुळे एकाच चित्रपटात या सगळ्या व्यक्तिरेखा न आणता पाच-पाच व्यक्तिरेखांना घेऊन तीन भागांमध्ये चित्रपट करण्याचा आपला विचार असल्याचे मांजरेकर यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा