‘देऊळ बंद’ या आगामी मराठी चित्रपटात प्रसिध्द अभिनेते महेश मांजरेकर फकिराच्या भूमिकेत दिसणार आहेत. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आणि अण्णासाहेब मोरे यांनी स्थापन केलेल्या श्री स्वामी समर्थ सेवामार्ग केंद्राच्या कार्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून केला जाणार आहे. श्री स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाविषयी स्वामींच्या भक्तांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. मराठीतील अनेक मोठी कलाकार मंडळी या चित्रपटाचा भाग होण्यास उत्सुक असून महेश मांजरेकर यात आघाडीवर आहेत. चित्रपटात ते फकिराची भूमिका साकारत आहेत. प्रथमच अशाप्रकारची भूमिका साकारत असलेल्या मांजरेकरांनी फकिराची वेशभूषा आणि रंगभूषेवर स्वत: जातीने काम केले आहे. विशेष म्हणजे, मागील आठवड्यात मुसळधार पाऊस पडत असतानादेखील मुंबईतील वाहतूक कोंडीतून आणि जागोजागी साठलेल्या पाण्यातून मार्ग काढत मांजरेकर चित्रीकरणाच्या स्थळी पोहचले. कामशेतजवळच्या ‘फेमस हायवे धाब्या’वर चित्रपटाचे चित्रीकरण पार पडले. प्रवीण तरडे आणि प्रणीत कुलकर्णी ही दिग्दर्शकांची जोडी ‘देऊळ बंद’चे दिग्दर्शन करीत आहे. महेश मांजरेकरांबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याने स्वप्नपूर्ती झाल्याचा आनंद प्रवीणने यावेळी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा