९०च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरीचा आज ४९वा वाढदिवस. ‘परदेस’ चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर बॉलिवूडमधील काही सुपरहिट चित्रपटांमध्ये महिमाने उत्तम भूमिका साकारल्या. इतकंच नव्हे तर बॉलिवूडमधील बड्या कलाकारांबरोबरही तिने काम केलं. आपल्या दमदार अभिनयामुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या महिमाला खासगी आयुष्यात मात्र अनेक कठीण प्रसंगांना सामोर जावं लागलं. काही महिन्यांपूर्वीच आपल्याला स्तनाचा कर्करोग झाला असल्याचं तिने सांगितलं. पण तिचं वैवाहिक आयुष्यही तितकंच चर्चेत राहिलं आहे.
काही वर्षांपूर्वी टेनिस पटू लिएंडर पेस आणि महिमा एकमेकांना डेट करत होते. या दोघांच्या नात्याच्या बऱ्याच चर्चा देखील रंगल्या. मात्र काही काळानंतर महिमा-लिएंडरमध्ये काहीतरी बिनसलं आणि या नात्याचा दी एण्ड झाला. त्यानंतर व्यावसायिक बॉबी मुखर्जीबरोबर महिमाने २००६मध्ये लग्न केलं. पण महिमाचं हे लग्नही फार काळ टिकू शकलं नाही. २०१३मध्ये बॉबी-महिमा विभक्त झाले.
२०२१मध्ये दिलेल्या एका मुलाखतीमध्ये महिमाने तिच्या खासगी आयुष्याबाबत खुलासे केले. खासगी आयुष्यामुळे आपल्या कामावरही त्याचा परिणाम झाला असं महिमाचं म्हणणं होतं. शिवाय बॉबी मुखर्जीशी लग्न झाल्यानंतर दोनवेळा तिला गर्भपाताचा सामना करावा लागला. बॉबीबरोबर खूश नसल्याचंही महिमाने सांगितलं होतं. महिमाने २००७मध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला. पण त्यानंतरचा काळ तिच्यासाठी फार कठीण होता.
आणखी वाचा – ‘ब्रह्मास्त्र’ला मिळत असलेल्या यशाबाबत कंगना रणौतचं टिकास्त्र, म्हणाली “बॉक्सऑफिस कलेक्शनचे आकडे खोटे अन्…”
बॉलिवूड बबला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये महिमाने सांगितलं की, “२००७मध्ये माझ्या मुलीचा जन्म झाला. त्यानंतर दोनवेळा मी गर्भपाताचा सामना केला. माझ्या मुलीच्या जन्मानंतर मला कुठे चित्रीकरणासाठी किंवा शोसाठी जायचं असेल तर माझी आई माझ्या मुलीचा सांभाळ करायची. माझ्या आईने माझ्या पडत्या काळामध्ये मला पाठिंबा दिला.” महिमा या सगळ्या प्रसंगांमधून सुखरुप बाहेर आली. पण काही महिन्यांपूर्वी तिला स्तनाच्या कर्करोगाशी सामना करावा लागला. आता कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटामधून महिमा बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे.