माझे पती सौभाग्यवती
प्रत्येक पुरूषामध्ये एक बाई दडलेली असते आणि प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरूष. ही दडलेली व्यक्ती कधी स्वभावातून समोर येते तर कधी एखाद्या गुणामधून. त्यामुळेच आपण अनेकदा एखाद्या स्त्रीच्या साहसी वृत्तीसाठी मर्दासारखी लढलीस अशी उपमा देतो. तर हळव्या झालेल्या पुरूषाला बायकांसारखा रडला असंही म्हणतो. खरं तर स्त्रीसाठी देण्यात आलेली पुरूषी उपमा ही तिच्या कर्तृत्वाची पावती असते परंतू पुरूषांना बायकी संबोधन वापरून एक प्रकारे कमीच लेखण्यात येतं. हे कमी लेखणं त्याच्या वागण्याला असतं की स्त्रीपणाला हा खरा कळीचा मुद्दा. स्त्रीच्या अशा हळव्या वृत्तीला कमी समजणा-या अनेकांना तिचं दुःख कळत नाही त्यामुळेच बाईचं दुखणं समजून घेण्यासाठी बाईच व्हावं लागतं असंही म्हटलं जातं. बाईच्या मनातील हेच दुखणं समजून घेण्याची एक आगळी वेगळी कथा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे झी मराठीच्या आगामी ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेतून. येत्या २८ सप्टेंबरपासून रोज रात्री ८.३० वा. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
या मालिकेची कथा आहे वैभव मालवणकर या स्ट्रगलर अभिनेत्याची. अभिनयाची आवड ज्याच्या मनातच नाही तर रक्तात भिनली आहे असा हा अभिनेता. एक मोठा नट बनण्याचं स्वप्न घेऊन तो या मुंबईत आलाय. अनेक वर्षे संघर्ष करूनही मनासारखं काम तर मिळालच नाही उलट वाट्याला आली ती अपमानास्पद वागणूकच. याही परिस्थितीत मात्र खचून न जाता तो आपलं स्वप्न उराशी बाळगून या स्वप्ननगरीत रोज धक्के खातोय. त्याच्या या संघर्षामध्ये त्याच्या प्रत्येक पावलावर त्याची मनोभावे साथ देतेय ती त्याची पत्नी लक्ष्मी. आपल्या पतीने खूप नाव कमावावं आणि मोठा अभिनेता व्हावं हे तिचंही स्वप्न. त्याच्या या स्वप्नपूर्तीसाठी काटकसरीचा संसार ती मोठ्या नेटाने चालवतेय. याच दरम्यान वैभवच्या आयुष्यात एक अशी घटना घडते ज्याद्वारे अभिनयाच्या संधीचं एक मोठं दार उघडतं. पण संघर्ष हा जणू त्याच्या जगण्याचा अविभाज्य भागच बनलाय त्यामुळे या संधीसोबतच येतो एक आगळा वेगळा संघर्ष तो म्हणजे स्वतःची मूळ ओळख लपविण्याचा. हाडाचा अभिनेता असलेल्या या नटाला जी मोठी भूमिका मिळते ती असते एका स्त्री पात्राची. अभिनेता म्हणून ओळख कमवायला आलेल्या वैभवला पहिल्यांदाच एक मोठी भूमिका मिळते पण तीही स्वतःची ओळखच मिटवून टाकणारी. पण हे आव्हान स्वीकारून स्वतःच्या अभिनेता या ओळखीबरोबरच या पात्राची नवी ओळख निर्माण करतो का ? आपल्या दैनंदिन आयुष्यात बाईचं अस्तित्व दुर्लक्षित करू पाहणाऱ्या त्याच्या आयुष्याला या कामामुळे कलाटणी मिळते का? त्याच्या स्वप्नांची पूर्तता होते का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेतून.
पुरूषाच्या संघर्षाची आणि बाईच्या अंतरंगाची आगळी वेगळी कथा
प्रत्येक पुरूषामध्ये एक बाई दडलेली असते आणि प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरूष. ही दडलेली व्यक्ती कधी स्वभावातून समोर येते तर कधी एखाद्या गुणामधून.
Written by चैताली गुरवguravchaitali
Updated:
आणखी वाचा
First published on: 25-09-2015 at 11:58 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Majhe pati saubhagyawati serial on zee marathi