झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. या मालिकेत येणाऱ्या अनेक ट्विस्टमुळे ही मालिका घराघरात लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे हे दोघे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. त्यासोबतच परीची भूमिका साकारणारी बालकलाकार मायरा वायकुळलाही विशेष पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेता संकर्षण कऱ्हाडे, प्रदीप वेलणकर या कलाकारांमुळे मालिकेला चार चांद लागले आहेत. मात्र आता लवकरच ही मालिका बंद होणार असल्याचे बोललं जात आहे.
‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून सिंगल मदर असलेली नेहा आणि तिची मुलगी परी यांच्या आयुष्यात येणारा श्रीमंत उद्योजक यशवर्धन यांची कथा दाखवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत नेहाचा पहिला पती अविनाश हा परत आला आहे. त्यामुळे नेहाच्या आयुष्यात खूप उलथापालथ सुरु आहे. परीचा ड्रायव्हर हाच नेहाचा पहिला नवरा अविनाश असल्याचं सत्य यशसमोर आल्याने आता या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. नेहाने हे सत्य लपवून ठेवल्याचा धक्का यशबरोबरच चौधरी कुटुंबाला बसला आहे. एकीकडे विविध ट्विस्ट येत असताना दुसरीकडे ही मालिका बंद होणार असल्याचे बोललं जात आहे.
आणखी वाचा : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील शेफालीच्या पतीचा ‘मुंबई इंडियन्स’शी आहे खास संबंध, जाणून घ्या
नुकतंच झी मराठीवर एका नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित होत आहे. दार उघड बये असे या मालिकेचे नाव आहे. येत्या १९ सप्टेंबरपासून ही मालिका सुरु होणार आहे. दररोज रात्री ८.३० वाजता ही मालिका प्रक्षेपित केली जाणार आहे. त्यामुळेच ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका बंद होणार असल्याचे बोललं जात आहे. यानंतर या मालिकेच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. अनेकांनी ही मालिका बंद करु नये, अशा कमेंटही केल्या आहेत. या नव्या मालिकेमुळे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेची वेळ बदलणार की ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे मात्र अजून अधिकृत जाहीर झालेलं नाही.
आणखी वाचा :‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून प्रार्थना बेहरेने घेतला ब्रेक, कारण आले समोर
‘दार उघड बये’ या मालिकेचा प्रोमो आल्यापासून ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका बंद होण्याची जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका निरोप घेणार अशीही चर्चा सुरु होती. पण त्या मालिकेतही अनामिकाच्या नवऱ्याची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे जर नवीन मालिका ८.३० वाजता प्रसारित केली जाणार असेल तर या वेळेत सध्या प्रसारित होणारी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका बंद करणार की तिची वेळ बदलणार असा विचार प्रेक्षक करत आहेत. दार उघड बये ही मालिका १९ सप्टेंबरपासून सुरु होत आहे. त्यामुळे १७ सप्टेंबरला ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रदर्शित होईल, अशी चर्चाही सोशल मीडियावर रंगली आहे.