‘झी मराठी’वरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका सध्या घराघरात लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत सातत्याने येणाऱ्या अनेक ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे हे दोघे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. त्यासोबतच परीची भूमिका साकारणारी बालकलाकार मायरा वायकुळलाही विशेष पसंती मिळत आहे. इतकंच नव्हे तर अभिनेता संकर्षण कऱ्हाडे, प्रदीप वेलणकर या कलाकारांमुळे मालिकेला चार चांद लागले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून ही मालिका बंद होणार असल्याची चर्चा रंगली होती. पण नुकतंच त्याबद्दलची नवी माहिती समोर आली आहे.
‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत सिंगल मदर असलेली नेहा आणि तिची मुलगी परी यांच्या आयुष्यात येणारा श्रीमंत उद्योजक यशवर्धन यांची कथा दाखवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत नेहाचा पहिला पती अविनाश परतल्याने अनेक उलथापालथ सुरु आहे. त्यातच परीचा ड्रायव्हर हा नेहाचा पहिला नवरा अविनाश असल्याचं सत्य यशसमोर आल्याने त्यांच्या दुरावा निर्माण झाला आहे. मालिकेत हे विविध ट्विस्ट येत असताना दुसरीकडे ही मालिका बंद होणार असल्याचे बोललं जात आहे.
आणखी वाचा : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील शेफालीच्या पतीचा ‘मुंबई इंडियन्स’शी आहे खास संबंध, जाणून घ्या
या मालिकेतील बहुतांश कलाकारांनी ही मालिका संपणार असल्याच्या भावूक पोस्टही इन्स्टाग्रामवर शेअर केल्या होत्या. या मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरणही झाल्याचे बोललं जात होतं. त्याचे व्हिडीओ-फोटोही समोर आले होते. पण आता निर्माते आणि वाहिनीनं त्यांचा हा निर्णय बदलल्याचे पाहायला मिळत आहे.
झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मालिकेचा एक फोटो शेअर केला आहे. त्यावर ‘ही रेशीमगाठ तुटायची नाय…’ असे लिहिले आहे. या फोटोला कॅप्शन देताना ‘एवढ्या सहजासहजी कशी तुटेल तुमची आणि आमची रेशीमगाठ …आम्ही कुठेही जात नाही आहोत’, असे लिहिण्यात आले आहे.
आणखी वाचा : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, नव्या प्रोमोमुळे चर्चांना उधाण
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्यापासून पुन्हा एकदा या मालिकेच्या शूटींगला सुरुवात होणार आहे. यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा यश आणि नेहाचं प्रेम, समीरची मैत्री, परीची धमाल आणि सिम्मीचे कारनामे पाहायला मिळणार आहे. मात्र त्या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे. ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी ६.३० वाजता पाहता येणार आहे.