चित्रपट दिग्दर्शक संजय जाधव यांचा आगामी ‘लकी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मोठी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटातलं ‘कोपचा’ हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं. हे गाणं प्रेक्षकांप्रमाणेच बॉलिवूड सेलिब्रेटींनाही भूरळ घालत असून नुकतीच बॉलिवूड अभिनेका जितेंद्र यांनी या गाण्यावर ठेका धरला होता. त्यामुळे सध्या या चित्रपटातील गाणी प्रेक्षक आणि बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पसंतीत उतरत असल्याचं दिसून येत आहे. कोपचाच्या लोकप्रियतेनंतर या चित्रपटातलं आणखी एक गाणं प्रदर्शित झालं आहे.

लकीमधलं ‘माझ्या दिलाचो’ हे कोंकणी गाणे प्रदर्शित झालं आहे. ‘सूर नवा ध्यास नवा’ रिअॅलिटी शोमधील चैतन्य देवढेने हे गाणं गायलं असून त्याचं हे पहिलं मराठी गाणं आहे.काही वर्षांपूर्वी ‘दुनियादारी’ चित्रपटातून ‘लिटील चॅम्प’ रोहित राऊतचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण झालं होतं. त्यानंतर ‘लकी’ या चित्रपटातून ‘राइझिंग स्टार’ चैतन्य देवढेचंही कलाविश्वात पदार्पण होत आहे.

गीतकार ‘यो’ (सचिन पाठक)च्या शब्दांना संगीतकार पंकज पडघन यांनी संगीत दिले आहे. आणि आळंदीच्या चैतन्य देवढेने ह्याला स्वरसाज चढवला आहे. ‘लकी’ चित्रपटात हे गाणे अभय महाजनवर चित्रीत झाले आहे.

‘या गाण्याच्या सिच्युएशनसाठी आम्हाला एका लहान मुलाचा आवाज हवा होता. आणि दिग्दर्शक संजय जाधव यांना चैतन्यचा आवाज खूप आवडला. आळंदीच्या चैतन्यला आवाजाचे दैवी देणगीच मिळाली आहे. त्याच्या आवाजातली निरागसता या गाण्याला अगदी साजेशी आहे. आणि अभयनेही हे गाणे रूपेरी पडद्यावर उत्तम साकारलंय’, असं चित्रपट निर्माते सूरज सिंग म्हणाले.

‘नव्या प्रतिभेसोबत काम करायला मला आणि संजयदादांना नेहमीच आवडते. चैतन्यची आकलन क्षमता खूप चांगली आहे. त्याने एकाच दिवसात या गाण्याचा सराव करून गाण्याचे रेकॉर्डिंग केले. चैतन्यला कोंकणी बोलता येत नाही. मात्र त्याच्या आवाजातलं हे गाणं ऐकल्यानंतर तो पहिल्यांदाच कोंकणी बोलत आहे असं चुकूनही कोणाला वाटणार नाही,असं संगीतकार पंकज पडघन यांनी सांगितलं.

‘बी लाइव्ह प्रोडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट ७ फेब्रुवारी २०१९ ला प्रदर्शित होणार आहे.