छोट्या पडद्यावरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रसिका धबडगावकर सध्या परदेशात अभिनयाचं शिक्षण घेत आहे. या मालिकेत तिने साकारलेली ‘शनाया’ ही भूमिका खूप गाजली होती. पण शिक्षणासाठी परदेशी जावं लागत असल्याने तिने ही मालिका मध्येच सोडली. मालिकेमुळे तिची लोकप्रियता इतकी वाढली की रसिकाच्या छोट्याछोट्या गोष्टी जाणून घेण्याचीही चाहत्यांना फार उत्सुकता असते. परदेशात असली तरीही रसिकाने चाहत्यांसोबतचं नातं कायम जोडून ठेवलं आहे. सोशल मीडियाद्वारे ती अनेकदा चाहत्यांशी संवाद साधते. इन्स्टाग्रामवर नुकतंच तिने चाहत्यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली होती. त्यादरम्यान एकाच्या प्रश्नावर रसिकाने तिचं रिलेशनशिप स्टेटससुद्धा सांगितलं.

या प्रश्नोत्तरादरम्यान अनेकांनी रसिकाला हाच प्रश्न विचारला की तू भारतात कधी परतणार आहेस? त्यावर अजूनही शिक्षण पूर्ण झालं नसल्याने इतक्यात परतण्याची शक्यता कमी असल्याचं उत्तर रसिकाने दिलं. एका चाहत्याने तिला सिंगल आहेस की कोणाला डेट करत आहेस असा प्रश्न विचारला. त्यावर ‘मी सुपर सिंगल’ असल्याचं रसिकाने स्पष्ट केलं.

https://www.instagram.com/p/BttSajYl-Xq/

इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधताना रसिकाने तिच्या आगामी प्रोजेक्टविषयीसुद्धा सांगितलं. येत्या काही दिवसांत तिचा एक लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं तिने सांगितलं. हा लघुपट कोणत्या विषयावर आधारित आहे आणि तिची भूमिका काय हे अद्याप स्पष्ट नाही.