महाराष्ट्रातील घराघरांत लोकप्रिय असलेला आणि ज्यात सहभागी व्हावं असं प्रत्येक महिलेचं स्वप्न असलेला कार्यक्रम म्हणजे झी मराठीवर प्रसारित होणारा होम मिनिस्टर. मागील बारा वर्षांपासून अविरतपणे हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. हा कार्यक्रम सादर करणारे सूत्रसंचालक आदेश बांदेकर हे तर घराघरांत ‘भावोजी’ म्हणून लोकप्रिय झाले आहेत. महाराष्ट्रातील विविध शहरांत, गावात जाऊन होम मिनिस्टरने तेथील महिलांना या खेळात सहभागी करुन घेत त्यांना पैठणीसहित काही आनंदाचे आणि कायम स्मरणात राहतील असे अनेक क्षण आजवर दिले आहेत. आजही सायंकाळची साडे सहाची वेळ ही प्रेक्षकांसाठी झी मराठी आणि होम मिनिस्टरकरिता हक्काची वेळ असते. आपली हीच लोकप्रियता टिकवत हा कार्यक्रम आजही प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी देत आहे. छोट्या पडद्याच्या विश्वात सलग बारा वर्षे चालणारा एकमेव दैनंदिन कार्यक्रम ही होम मिनिस्टरची आणखी एक ओळख. एका ठराविक अंतरानंतर एखादं नविन पर्व आणत विविध वयोगटांतील महिलांना सहभागी करुन घेण्याचा होम मिनिस्टरचा मानस आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विविध सणांच्या निमित्ताने सादर होणा-या भागांचे वैशिष्ट्य तर काही औरच. अशाच सणा-उत्सवांच्या गर्दीत वर्षाच्या सुरुवातीला येणारा पहिला मराठी सण म्हणजे मकर संक्रांत. ‘तिळगुळ घ्या गोड गोड बोला’ म्हणत नात्यातील गोडवा जपण्याचा संदेश देणारा हा सण. या गोड सणानिमित्त होम मिनिस्टरचा एक खास सोहळा प्रेक्षकांच्या भेटीस येत असून १५ जानेवारीला हा खास भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ज्यात सहभागी होणार आहेत झी मराठीवर सध्या सुरु असलेल्या लोकप्रिय मालिकांमधील तुमच्या आवडत्या प्रमुख जोड्या. येत्या रविवारी सायंकाळी ७ वाजता हा सोहळा झी मराठी वाहिनीवरुन प्रसारित होणार आहे.

डोंबिवली जिमखानामधील मैदानावर होम मिनिस्टरचा हा संक्रांत विशेष भाग रंगला. ज्यात झी मराठीच्या नायक-नायिकांसह सामान्य महिलांनाही सहभागी होण्याची आणि पैठणीचा मान मिळविण्याची संधी मिळाली. ‘जय मल्हार’ मालिकेतील खंडोबाची भूमिका साकारणारे देवदत्त नागे आणि ‘बानूची’ भूमिका साकारणारी ईशा केसकर, ‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकेतील ‘राधिका’ म्हणजेच अभिनेत्री अनिता दाते, ‘शनाया’ रसिका सुनिल, ‘गुरुनाथ’ अभिजित खांडकेकर, सर्वांचे लाडके ‘शिव – गौरी’ आणि इतर मालिकांतील कलाकारांनीही हजेरी लावली होती.

या सर्व कलाकारांसोबतच उपस्थित महिलांच्या नावांमधून लकी ड्रॉ पद्धतीने निवड झालेल्या काही सामान्य महिलाही सहभागी झाल्या होत्या. होम मिनिस्टरच्या लोकप्रियतेचे सर्वात मोठे श्रेय जाते ते म्हणजे आदेश बांदेकर यांना. आपल्या खुमासदार निवेदनाने आणि खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम रंगवण्याचं कसब त्यांच्याकडे आहे आणि याचा प्रत्यय याही कार्यक्रमात आला. या सर्वांसोबत मजेदार खेळ खेळतांना आदेश भावोजींची उत्स्फूर्तता, हजरजबाबीपणा आणि गमतीशीर निवेदनाने खेळात विशेष रंगत आणली. नायिकांमध्ये बाजी मारत पैठणी जिंकण्याचा मान मिळवला ‘काहे दिया परदेस’च्या गौरीने. यासोबतच काही खेळांमध्ये इतरही नायिकांना पैठणीचा हा मान मिळाला त्या कोण आहेत आणि खेळांमध्ये त्यांनी कशी धम्माल आणली हे या विशेष सोहळ्यातून बघायला मिळेल. असा हा मकर संक्रांतीच्या निमित्ताने रंगणारा होम मिनिस्टरचा हा रंगतदार सोहळा पाहायला विसरु नका.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Makar sankranti special episode of home minister on zee marathi will telecast on 15 january