तनुश्री दत्ता हिच्या आरोपानंतर अनेक कलाकारांनी तिला पाठिंबा दर्शवला आहे. पण कोणीही काही म्हणो मी नाना पाटेकर यांच्या पाठी आताही आणि नंतरही कायम स्वरुपी उभा राहिन, असं म्हणत मकरंद अनासपुरे यांनी नानांची पाठराखण केली आहे.

‘या प्रकरणात मी नाना पाटेकर यांच्या पाठी उभा आहे. नाना गेली पाच दशकं या क्षेत्रात काम करत आहे त्यांच्यावर कोणीही बोट दाखवलं नाही, त्यांचा स्वभाव रागीट आहे हे मी मान्य करतो पण त्यालाही कारणं आहेत. तनुश्रीनं दहा वर्षांनंतर पुन्हा तेच आरोप नानांवर करणं चुकीचं आहे. तिच्या आरोपामागचा बोलवता धनी कोण आहे हे शोधलंच पाहिजे.

या प्रकरणाकडे समंजसपणे आणि संयमानं पाहिलं पाहिजे, सत्य सर्वांना ठावूक आहे पण ते योग्य पद्धतीनं लोकांपर्यंत येणं गरजेचं आहे त्यामुळे मी जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी नानांसोबत आहे. नाना पाटेकर यांनी चित्रपटसृष्टीसाठीचं नाही तर देशासाठीही मोलाचं योगदान दिलं आहे, त्यामुळे त्यांच्यापाठी मी सदैव उभं राहणार’, असं मत मकरंद अनासपुरे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मांडलं आहे.

२००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान नाना पाटेकर यांनी माझ्याशी असभ्य वर्तन केलं असा आरोप तनुश्रीनं केला आहे. या प्रकरणात तिनं नाना पाटेकर यांच्या विरुद्ध पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. तर बदनामी केल्याप्रकरणी तनुश्रीनं माफी मागावी अशी नोटीस नाना पाटेकर यांनी तनुश्रीला पाठवली आहे.

 

Story img Loader