सुपरस्टार रजनीकांत गेली अनेक वर्ष चित्रपट सृष्टी गाजवत आले आहेत. त्यांची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना भुरळ घालते. तर रजनीकांत सध्या त्यांच्या ‘जेलर’ या चित्रपटासाठी खूप चर्चेत आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. त्यांच्या या चित्रपटात दोन लोकप्रिय मराठी अभिनेतेही महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत हे तुम्हाला माहित आहे का?
रजनीकांत यांचा ‘जेलर’ हा चित्रपट १० ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या गाण्यांना आणि ट्रेलरला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. तर आता तितकाच चांगला प्रतिसाद ते या चित्रपटालाही देत आहेत. ‘जेलर’मध्य रजनीकांतसह जैकी श्रॉफ, शिवा राजकुमार, सुनील, तमन्ना भाटिया, राम्या कृष्णन, मिरना मेनन, योगी बाबू यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पण त्यांच्याबरोबरच दोन आघाडीचे मराठी अभिनेते यात रजनीकांत यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसत आहेत.
रजनीकांत यांच्या ‘जेलर’ चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणारे हे दोन अभिनेते म्हणजे मकरंद देशपांडे आणि गिरीश कुलकर्णी. या चित्रपटामध्ये गिरीश कुलकर्णी पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहेत. तर या चित्रपटात त्यांची एन्ट्री देखील रजनीकांत यांच्याबरोबरच होते. रजनीकांत आणि त्यांचा जेलमधील एक सीन प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे. तर दुसरीकडे अभिनेते मकरंद देशपांडे या चित्रपटामध्ये गुंडाची भूमिका साकारताना दिसत आहेत. जेलमध्ये रजनीकांत त्यांना धडा शिकवतो आणि नंतर तेच रजनीकांत यांची मदत करतात तसेच चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. मकरंद देशपांडे आणि गिरीश कुलकर्णी यांच्या कामाचंही खूप कौतुक होत आहे.
दरम्यान, ‘जेलर’ हा चित्रपट चित्रपटगृहात दमदार कामगिरी करताना दिसत आहे. या चित्रपटाने चार दिवसांमध्येच भारतात तब्बल ३०० कोंटीचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत तब्बल ५ विक्रम मोडीत काढले आहेत.