‘मेक इन इंडिया’ सप्ताहअंतर्गत रविवारी गिरगाव चौपाटीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला बॉलीवूड अभिनेता आमिर खान हादेखील उपस्थित होता. या कार्यक्रमादरम्यान लागलेली आग ही दुर्दैवी घटना होती. पण ही परिस्थिती योग्य प्रकारे नियंत्रणात आली, असे आमिर म्हणाला.
याविषयी बोलताना आमीर म्हणाला की, चौपाटीवर सांस्कृतिक कार्यक्रम सुरु असताना अचानक आग लागली. ही घटना फारच दुर्दैवी होती. जोरदार वाऱ्यांमुळे आगीने रौद्ररुप धारण केले. पण मुंबई पोलीस, अग्निशमन विभाग आणि महाराष्ट्र सरकारने ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. उपस्थित प्रेक्षकांना कोणत्याही चेंगराचेंगरीशिवाय प्रवेशद्वारातून बाहेर काढण्यात आले. संपूर्ण आग आटोक्यात येईपर्यंत स्वतः मुख्यमंत्रीही तेथेच थांबले होते. यावेळी आपत्ती व्यवस्थापनाने उत्कृष्टरित्या काम केले.
‘मेक इन इंडिया’ सप्ताहअंतर्गत रविवारी गिरगाव चौपाटीवर आयोजित करण्यात आलेला ‘महाराष्ट्र रजनी’ कार्यक्रम सुरू असतानाच व्यासपीठाला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मोठय़ा प्रमाणात आग लागली होती. मात्र अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, आमिर खान आणि अन्य दिग्गज सेलिब्रेटी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Story img Loader