नेटफ्लिक्सवरील ‘फौदा’ या वेबसीरिजने साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं. इस्रायली गुप्तचर संस्था आणि तिथली आतंकवादाची समस्या यावर बेतलेल्या या सीरिजचा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच गोव्यात सुरू असणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या नव्या सीझनचा प्रीमियर पार पडला. या सोहळ्यात सीरिजमध्ये काम करणारा अभिनेता आणि निर्माता लिओर राज आणि अवी इसाचरोफ यांनी हजेरी लावली.
या कलाकारांचे स्वागत करण्यासाठी बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याला निमंत्रित करण्यात आलं होतं. ‘फौदा’च्या चौथ्या सीझनचे स्पेशन स्क्रीनिंग सुरू होण्याआधी लिओर आणि अवी यांनी राजकुमारशी तसेच तिथल्या पत्रकारांशी संवाद साधला. इतकंच नाही तर भविष्यात राजकुमारबरोबर काम करण्याची इच्छासुद्धा त्या दोघांनी व्यक्त केली.
आणखी वाचा : “लग्नात महिला पाश्चिमात्य कपडे…” ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी मुलाखतीदरम्यान व्यक्त केली खंत
रेड कारपेटवर संवाद साधताना या दोघांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “राजकुमार एक स्टार आहे, त्याची देहबोली, तो ज्या पद्धतीने स्वतःला सादर करतो हे एका स्टारचं लक्षण आहे.” लिओर म्हणाला, “आम्हाला राजकुमारबरोबर नक्कीच काम करायला आवडेल.” इतकंच नाही तर या दोघांनी राजकुमार रावच्या नेटफ्लिक्सवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ या चित्रपटाचेही कौतुक केले.
‘फौदा ४’च्या ग्रँड स्क्रीनिंगसाठी भारतात यायची संधी मिळाली याबद्दल लिओर आणि अवी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “आम्हाला इथे येऊन खूप आनंद झाला. आमच्या सीरिजची कथा भारतीय चाहत्यांना प्रचंड आवडली आहे. त्यांनी दिलेलं प्रेम आणि पाठिंबा यासाठी आम्ही कायम त्यांचे ऋणी राहू. आम्हाला नक्कीच भारतीय चित्रपटसृष्टीबरोबर एकत्र काम करायला आवडेल.” ‘फौदा’चा सीझन ४ २० जानेवारी २०२३ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.