माधुरीच्या नृत्यात असं काय आहे, की इथे आबालवृद्ध तिच्या नृत्याचे वेडे आहेत. शोदरम्यान कितीतरी लोक तिला गराडा घालून असतात. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत असतात. मी इतकी र्वष एक निष्णात नर्तक म्हणून काम करतो आहे. पण तरीही लोकांचं हे अतोनात प्रेम, त्यांचं एखाद्याभोवती गराडा घालणं हे सर्व माझ्यासाठी अगदी नवीन आहे.
‘झलक दिखला जा’चा परीक्षक म्हणून भारतात येऊन त्याला दोन दिवस झाले असतील-नसतील, तोपर्यंत त्याचं नाव घरोघर झालं होतं. हॉलीवूडची अभिनेत्री, गायिका जेनिफर लोपेझ आणि युक्रेनियन नर्तक मॅक्सिम श्मर्कोस्वस्की एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या चर्चाना देशोदेशीच्या वर्तमानपत्रांमधून उधाण आलं होतं. मात्र, इथे येऊन ‘झलक..’च्या सेटवर रममाण झालेल्या मॅक्सिमला जेनिफरशी काहीच देणंघेणं नव्हतं. त्याला कोडं पडलंय ते माधुरी दीक्षित-नेनेच्या नृत्यात असं नेमकं काय आहे की प्रत्येक शो संपल्यानंतर तिच्याभोवती लोकांचा गराडा पडलेला असतो. सध्या तरी तो या प्रश्नाचं उत्तर शोधतोय तेही माधुरीच्याच मदतीने.. स्वत: डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये विजेतेपद मिळवून आत्ता ‘झलक दिखला जा’साठी परीक्षक म्हणून काम पाहणाऱ्या मॅक्सिमशी मारलेल्या गप्पा..
 परीक्षकाच्या खुर्चीची मजा अनुभवायला प्रत्येकालाच आवडतं, पण या खुर्चीपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यावर विराजमान झाल्यानंतर एक नर्तक, कोरिओग्राफर म्हणून येणाऱ्या जबाबदारीची जाणीव काय असते हे मॅक्सिम श्मर्कोव्हस्कीने स्वत: अनुभवलं आहे. सध्या तो प्रथमच भारतात परीक्षक म्हणून आला असला तरी त्याला ना इथल्या नृत्यप्रकारांची माहिती आहे, ना इथल्या नर्तकांची, ना कलाकारांची. पण नृत्य हे भाषा आणि संस्कृतीच्या पलीकडे जाऊन लोकांना एकमेकांशी जोडतं यावर मॅक्सिमचा ठाम विश्वास आहे. आणि त्याच विश्वासाने परीक्षक म्हणून आपण हे आव्हान स्वीकारायला सज्ज आहोत, असं मॅक्सिमने सांगितलं.
मी याआधी भारताविषयी खूप ऐकलं आहे, पण इथे यायचा योग कधीच जुळून आला नाही. भारतातील लोक त्यांच्या संस्कृतीशी, इतिहासाशी, परंपरांशी घट्ट बांधलेले असतात, हे मला ऐकून माहिती आहे. आणि माझ्यासाठी त्यांचं तसं असणं हा नेहमीच कौतुकाचा विषय राहिला आहे. मला भारताविषयी आकर्षण होतंच; आता तर प्रत्यक्ष इथे येऊन काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे इथल्या लोकांविषयी, संस्कृतीविषयी शक्य तितक्या जास्त गोष्टी जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असेल, असं त्याने सांगितलं.
भारतात नृत्य म्हटलं की बॉलीवूड हे ठरलेलं समीकरण आहे. त्याविषयी बोलताना मॅक्सिम म्हणतो, बॉलीवूडचे काही सिनेमे मी पाहिले आहेत. बॉलीवूड चित्रपटातील नृत्यप्रकारांबाबत मला माहिती आहे. पण तरीही इथे येऊन हिंदी गाण्यांवर नाचण्याबाबत सध्या तरी मी काहीच बोलणार नाही, असा सावध पवित्रा त्याने घेतला. अर्थात, सेटवरही शेजारच्याच खुर्चीत माधुरी बसलेली असल्यामुळे परत मातृभूमीला जाईपर्यंत बॉलीवूडविषयक बित्तंबातमी मिळण्याची पूर्ण खात्री मॅक्सिमला आहे. मात्र, इथे आल्यापासून आपल्याला खरी उत्सुकता लागली आहे ती माधुरीभोवतीच्या वलयाची, असं बोलता बोलता तो सांगून मोकळा होतो. मॅक्सिम स्वत: निष्णात नर्तक आहे. ‘डान्सिंग विथ स्टार्स’ या आंतरराष्ट्रीय रिअ‍ॅलिटी शोच्या अठराव्या पर्वाचा तो विजेता आहे. मात्र गेली कित्येक र्वष तो या शोच्या विविध पर्वामध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतो आहे. सातत्याने दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावर विजेता राहणाऱ्या मॅक्सिमने अखेर मे २०१४ मध्ये झालेल्या अठराव्या पर्वावर विजेता म्हणून स्वत:चं नाव कोरलं. एक स्पर्धक म्हणून प्रत्यक्ष प्रवास अनुभवलेला असल्यामुळे आता परीक्षकाच्या भूमिकेत बसल्यावरही आपण स्पर्धकाला एका स्पर्धकाच्या भूमिकेत शिरूनच तपासणार असल्याचे मॅक्सिम म्हणतो. मी स्वत: प्रशिक्षित नर्तक नसलेल्या कलाकारांबरोबर अनेकदा नृत्य केलेलं आहे, त्यामुळे यात किती मेहनत घ्यावी लागते हे मला ठाऊक आहे. म्हणूनच त्यांच्या नृत्यकौशल्याचं परीक्षण करताना एक स्पर्धक म्हणून त्यांच्या जागी उभे राहत नवं काही हाती लागतं आहे का याची चाचपणीही करणार असल्याचे त्याने या वेळी बोलताना सांगितलं.
अर्थात, इथे येऊन परीक्षण करताना मॅक्सिमसमोर भाषा हा सर्वात मोठा अडसर असेल. मात्र, नृत्य समजण्यासाठी भावना आणि संगीताची जाण याची सर्वात जास्त गरज असल्याचं तो म्हणतो. या शोमध्ये प्रत्येक स्पर्धक मनापासून नृत्य करील. नृत्य करताना स्पर्धकांनी परीक्षकांचं आणि प्रेक्षकांचं आपल्या नृत्यातून मनोरंजन करणं हे सर्वात महत्त्वाचं असतं. माझ्यासाठी ते नृत्य कसं करतात आणि स्वत:ला प्रत्येक पायरीवर कसं घडवत जातात, हे पाहणंही महत्त्वाचं आहे. नृत्य हे विज्ञान नाही. त्याला कुठलेही नियम नाहीत. तुम्ही जेव्हा तुमच्या जोडीदाराबरोबर नाचत असता तेव्हा केवळ तुमच्या दोघांमध्ये संवाद होत नसतो, तर प्रेक्षकांशीही ते संवाद साधत असतात. हा संवाद कुठल्याही शब्दांविना पण, तालाशी बांधलेला असतो. आणि म्हणूनच एक कलाकार म्हणून आपलं नृत्य साकारत असताना तुम्ही तुमच्या नृत्याशी प्रमाणिक असणं गरजेचं आहे, असं आग्रही प्रतिपादनही मॅक्सिमने केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा