नाते मग ते नवरा-बायकोचे असो किंवा कुटुंबातील सदस्यांचे परस्परांशी असो या नात्यांमध्ये येणारे गुंते लवकर सोडवा. ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ चित्रपट हा शहरी जीवनात माणसांवर येणारे दबाव आणि नातेसंबंधांवर भाष्य करतो. गश्मीर महाजनी आणि स्पृहा जोशी या जोडीला प्रथमच रजतपटावर पाहण्याचे औत्सुक्य प्रेक्षकांना यानिमित्ताने अनुभवता येणार आहे. ‘फिल्मी किडा’ निर्मित ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ हा चित्रपट ११ ऑगस्टपासून रसिकांच्या भेटीला येत आहे. ‘टाईम प्लीज’, ‘डबल सीट’ आणि ‘वाय झेड’ असे तीन यशस्वी चित्रपट देणाऱ्या समीर विद्वांस याने ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. पी. ए. छतवाल, रिचा सिन्हा आणि रवी सिंह यांनी निर्मिती केलेल्या या चित्रपटात गश्मीर आणि स्पृहा हे प्रमुख भूमिकेत आहेत.
निर्मिती सावंत, कमलेश सावंत, विजय निकम, मंगल केंकरे, साहील कोपर्डे, सीमा देशमुख, आरश गोडबोले यांच्यासह ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी या चित्रपटात काम केले आहे. गुरू ठाकूर आणि वैभव जोशी यांच्या गीतांना सौरभ, हृषिकेश दातार आणि जसराज जोशी यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटात चार गीते असून बेला शेंडे, आनंदी जोशी, प्रियांका बर्वे आणि जसराज जोशी यांनी पाश्र्वगायन केले आहे. रवी सिंह यांची कथा असून कौस्तुभ सावरकर यांनी पटकथा-संवादलेखन केले आहे. प्रत्येक नातं टिकविण्यासाठी ते वेळोवेळी फुलवत ठेवावं लागतं. आपल्या आधीची पिढी आणि आपली पिढी यांच्या विचारांचा आणि तत्त्वांचा प्रवास यावर ‘मला काही प्रॉब्लेम नाही’ चित्रपट बोलतो. एका अर्थाने हा चित्रपट सर्वाना आपलासा वाटेल असा आहे. त्यातील व्यक्तिरेखांशी सर्वच वयोगटातील प्रेक्षक आपल्याला पडताळून घेऊ शकतील, असे समीर विद्वांस याने सांगितले.
‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ हे वाक्य आपण सगळेच दिवसातून किमान चार-पाच वेळा तरी बोलत असतो. असे म्हणताना आपण हो किंवा नाही यापैकी काहीच म्हणत नाही. त्यातून प्रश्न निर्माण होऊ शकतात. अशा प्रश्नांकडे वेळीच बघा. त्याचा गुंता होऊ दिला नाही तर तो प्रश्न मोठा होणार नाही हे सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे, असेही समीरने सांगितले. या चित्रपटामध्ये गश्मीर महाजनी याने संयत अभिनय केला आहे. मराठी चित्रपटसृष्टीला विवेक आणि काशिनाथ घाणेकर यांच्यानंतर एक दणकट नायक मिळाला आहे, सतीश आळेकर यांनी सांगितले. ‘व्हेन्टिलेटर’, ‘चिं. सौ. कां’ आणि आणि आता ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ या चित्रपटातील भूमिकांमुळे ललित कला केंद्रातील निवृत्तीनंतरचा माझा काळ मजेत चालला आहे, अशी टिपण्णीही त्यांनी केली.