बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. काही दिवसांपूर्वीच एका अपघातातून बचावलेल्या मलायकानं पुन्हा एकदा तिचं नेहमीच आयुष्य जगायला सुरुवात केली आहे. काम, वर्कआऊट, योगा या सर्व गोष्टींना तिने पुन्हा सुरुवात केली आहे. पण जेव्हा काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचं लग्न झालं. तेव्हा त्यांच्या रिसेप्शन पार्टीला जाण्याची मलायकाला फार भीती वाटत होती. त्यासाठी तिला बऱ्याच लोकांनी समजावल्यावर ती या पार्टीला जाण्यास तयार झाली होती.

मलायकाचा अपघात झाल्यानंतर ती रणबीर आलियाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसली होती. पण या पार्टीला येण्याआधी तिला खूप भीती वाटत होती. या भीतीचं कारण होतं त्याआधी झालेला तिचा अपघात. कारला झालेल्या अपघातानंतर मलायकाचं आयुष्य हळूहळू पूर्वपदावर आलं मात्र तिला पुन्हा कारमध्ये बसण्याची भीती वाटत होती आणि त्यामुळे ती रिसेप्शन पार्टीला जाण्यास तयार नव्हती. पण अखेर तिची समजूत काढल्यावर ती या पार्टीला जाण्यास तयार झाली.

‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मलायका म्हणाली, “मी शारिरीकदृष्ट्या तंदुरुस्त आहे. पण माझी मानसिक स्थिती अजूनही सावरलेली नाही. माझ्या मनात त्या दुर्घटनेची भीती अद्याप आहे. त्यामुळे मला बाहेर जायची, कारमध्ये बसण्याची खूप भीती वाटते. अशात मी बाहेर जावं म्हणून मला समजावलं जातं. अगदी रणबीर- आलियाच्या रिसेप्शन पार्टीला जाण्याची देखील मला भीती वाटत होती. मी तिथे पोहाचले तेव्हा माझ्या कारच्या बाजूला असलेल्या लोकांना पाहून मी घाबरले होते. आता मी जेव्हा जेव्हा कारमध्ये बसते तेव्हा लगेच सीटबेल्ट लावते. जरी कारमध्ये मागे बसले तरीही मी सीटबेल्ट लावून ठेवते.”

दरम्यान या मुलाखती तिला अर्जुन कपूरसोबत लग्न करण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, “आम्हाला भविष्यात एकत्र राहायचे आहे, ही गोष्ट आम्हाला माहिती आहे. आम्ही दोघेही आता कोणत्या टप्प्यावर आहोत आणि जिथून पुढे आम्हाला काय करायचे याची आम्हाला माहिती आहे. आम्ही या गोष्टींवर नेहमी चर्चा करतो. आमचे विचार आणि कल्पना या सारख्या असतात. त्यामुळेच आम्ही एकत्र असतो. आम्ही दोघेही आता मॅच्युअर आहोत. पुढे भविष्यात आम्ही एकत्र आलेलं मला नक्कीच आवडेल आणि ते नाते कुठपर्यंत असेल हे पाहण्यासाठी मी फार उत्सुक आहेत. आम्ही दोघेही हसत, मजा मस्ती करत असलो तरीही आम्ही या नात्याबद्दल फार गंभीर आहोत.”

Story img Loader