अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. १८ वर्षांच्या संसारानंतर हे दोघे विभक्त झाले. घटस्फोटानंतर दोघांनीही वेगळ्या वाटा निवडल्या. एकीकडे अरबाज खान जॉर्जिया अँड्रियानी या मॉडेलला डेट करत आहे तर दुसरीकडे मलायका आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या अफेअरविषयी जोरदार चर्चा आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मलायकाने तिच्या घटस्फोटाच्या निर्णयावर वक्तव्य केलं.

‘घटस्फोटामुळे मला आयुष्यात पुढे जाण्याचं आणि निवड करण्याचं स्वातंत्र्य मिळालं. भूतकाळातील गोष्टींच्या तणावाशिवाय मी हे करू शकले,’ असं ती म्हणाली. यावेळी मलायका तिच्या नव्या नात्याविषयीसुद्धा मनमोकळेपणाने व्यक्त झाली. ‘कधी ना कधी प्रत्येकाला एका नात्यात अडकायचं असतं, कोणीतरी सोबत हवं असतं. आयुष्यभरासाठी कोणी एकटं राहू इच्छित नाही,’ असं ती पुढे म्हणाली.

या मुलाखतीत तिने अर्जुनसोबतच्या नात्याला नकारही नाही दिला आणि त्याबद्दल ठोसपणे ती काही बोललीसुद्धा नाही. अर्जुनसोबतच्या नात्याची औपचारिक घोषणा तिनं केली नसली तरी ते दोघंही लग्न करतील अशाही चर्चा आहेत. पहिल्यांदा एका फॅशन शोमध्ये दोघंही एकत्र दिसले होते तेव्हापासून या दोघांमध्ये काहीतरी शिजतंय अशा चर्चा होत्या. सार्वजनिक ठिकाणी मलायका आणि अर्जुन एकत्र वावरत असले तरी या दोघांनीही आपल्या नात्याला अधिकृतरित्या दुजोरा दिलेला नाही. कॉफी विथ करण कार्यक्रमात अर्जुन कपूर मला आवडतो अशी कबुली तिनं दिली होती.

Story img Loader