अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यातील नात्यामुळे चर्चेत आहेत. पहिले त्यांच्या भेटींची चर्चा व्हायची आता त्यांच्या लग्नाची चर्चा आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या लग्नाची तारीख देखील समोर आली आहे. त्यांच्या लग्नाच्या या चर्चांवर मलाकाने तिची प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मलायका आणि अर्जुन १९ एप्रिल रोजी लग्न बंधनात अडकणार असल्याची चर्चा होती. सूत्रांनुसार, मलायकाची बहिण अमृता अरोरा, मैत्रीण करिश्मा कपूर या मलायकाच्या ब्राइड्समेड तर रणवीर सिंह बेस्टमॅन होणार असल्याची चर्चा रंगली आहे. इतकंच नाही तर हे दोघे ख्रिश्चन रिती-रिवाजानुसार लग्न बंधनात अडकणार असल्याचंही म्हटलं जात आहे. मात्र या साऱ्या चर्चांवर मलायकाने खुलासा केला आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, मलायका -अर्जुनच्या लग्नाच्या निव्वळ अफवा असून खुद्द मलायकानेच या अफवा असल्याचं एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. विशेष म्हणजे चित्रपट दिग्दर्शक बोनी कपूर यांनीही काही दिवसांपूर्वी या अफवा असल्याचं म्हटलं होतं.
दरम्यान, मी आणि अर्जुन लग्न करणार नाही, असं मलायकाने म्हटल्यामुळे आता या चर्चेवर पडदा पडल्याचं दिसून येत आहे. मलायकाने २०१७ मध्ये पती अरबाज खानसोबत घटस्फोट घेतला. त्यानंतर ती अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत होती. २०१८मध्ये मलायका आणि अर्जुनचे मिलानमध्ये हातात हात घालून फिरत असल्याचे काही फोटो इन्टाग्रामवर व्हायरल झाले होते. तसेच त्या दोघांना बऱ्याचदा एकत्र पहायला मिळाले होते. परंतु त्या दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याची कबूली दिली नाही.