‘किंग खान’, ‘बाजीगर’, ‘किंग ऑफ रोमॅन्स’ अशा विविध नावाने ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे शाहरुख खान. बॉलिवूडच्या किंग खानचा आज ५५ वा वाढदिवस साजरा करत आहे. शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांसह अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देतेवेळी तिने शाहरुखसोबतचे दोन फोटो पोस्ट केले आहेत.
मलायकाने शेअर केलेला एक फोटो हा ‘चल छैंया छैंया’ या गाण्यातील आहे. तर दुसरा फोटो हा ‘काल काल’ या गाण्यादरम्यानचा आहे. या दोन्हीही फोटोत ती शाहरुखसोबत डान्स करताना दिसत आहे. या फोटोंना कॅप्शन देतेवेळी मलायका म्हणाली, “२३ वर्षांपूर्वी मी एक फॅन गर्ल होती आणि अजूनही आहे. मी तुम्हाला इतक्या वर्षापासून पाहते आहे. तुम्ही ज्याप्रकारे स्वत:ला यात वाहून घेतले ते पाहून फक्त आनंदच नाही तर प्रेरणाही मिळते. तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना दररोज आणि दरवर्षी चांगले बनवण्यासाठी जी मेहनत घेता ती आश्चर्यकारक आहे. यंदा हा दिवस अधिक खास आहे. हा एक गोड दिवस आहे आणि मला आशा आहे की तुम्हाला सर्व मिळू दे. वाढदिवसाच्या शुभेच्छा,” अशी पोस्ट तिने केली आहे.
मलायकासोबत अभिनेत्री अनुष्का शर्माने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, सदैव अशाचप्रकारे चमकत राहा,” असे तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
तर अभिनेता रितेश देशमुखने त्याला शुभेच्छा देताना म्हटले, “आमचा नेहमीच आवडता शाहरुख खान तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आमच्या हृदयात तुझ्यासाठी फक्त प्रेम आहे. जेनेलियाकडून खूप खूप शुभेच्छा,” असे त्याने यात लिहिले आहे.
नेहमी चिरतरुण असणाऱ्या शाहरुख खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा. “तुला दीर्घायुष्य लाभो आणि तुझए आयुष्य आनंदाने भरलेले राहू दे, अशा शुभेच्छा अभिनेत्री माधुरी दीक्षितने दिल्या आहेत.
दरम्यान ‘दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘बाजीगर’, ‘डर’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘दिल तो पागल है’, ‘देवदास’ आणि अशा विविध चित्रपटातून शाहरुख खानने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या संवाद कौशल्यापासून ते अगदी दोन हात हवेत पसरवून त्याची ‘सिग्नेचर’ पोझ देण्यापर्यंतच्या त्याच्या अंदाजावर अनेकजण फिदा आहेत. शाहरुखचा अंदाज आणि त्याच्या डायलॉग्सची बॉलिवूडमध्ये खास ओळख आहे.
शाहरुखचे चित्रपट, त्यातील गाणी, त्याने साकारलेल्या भूमिका आणि त्याचे डायलॉग हे एक वेगळेच समीकरण आहे. टेलिव्हीजन मालिकेच्या माध्यमातून शाहरुखचा चेहरा सर्वांसमोर आला. ‘फौजी’ या मालिकेद्वारे शाहरुखची वाटचाल सुरु झाली. त्यानंतर ‘दिवाना’ या चित्रपटापासून सुरु झालेला शाहरुखचा चित्रपटसृष्टीतील सुरू झालेला प्रवास आजतागायत सुरुच आहे.