#MeToo या मोहिमेअंतर्गत दिग्दर्शक साजिद खान याच्यावर अभिनेत्री अमृता पुरी, करिश्मा उपाध्याय यांनी आरोप केल्यानंतर साजिदच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. साजिदसोबतच त्याच्या कुटुंबियांनाही हा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अभिनेत्री मलाइका अरोरा खान आणि ज्येष्ठ अभिनेत्री किरण खेर साजिदच्या मदतीला धावून आल्या आहेत.  ‘इंडियाज् गॉट टॅलेंट ८’ च्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी त्यांचं मत मांडलं आहे.

‘सध्या अनेक जण मी टूच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. त्यामुळे अनेक व्यक्तींवर लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले आहेत. यात साजिदच्याच नावाचा समावेश नाही. त्यामुळे कृपया तुम्ही सतत साजिद खान यांच्याविषयी प्रश्न विचारु नका. साजिद कसा आहे हे आम्हाला चांगलं माहित आहे. आम्ही त्याला ओळखतो, त्यामुळे या चर्चांना उधाण देणं बंद करा’, असं मलाइका म्हणाली.

‘मला मी टू विषयी कोणताही प्रश्न विचारा. मी त्याची उत्तर द्यायला तयार आहे. परंतु कृपा करुन साजिदबद्दल काही विचारु नका. कारण यात किती सत्य आहे आणि किती खोटं हे केवळ साजिदला माहित आहे. त्यामुळे याविषयी केवळ तो किंवा त्याच्यावर आरोप करणारे व्यक्तीच सांगू शकतात. मी नाही’, असं किरण खेर म्हणाल्या.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसापासून साजिद खान यांच्यावर लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. अभिनेत्री अमृता पुरीने तर साजिदसोबतच त्याच्या कुटुंबियांवर काही आरोप केले आहे. त्यामुळे अभिनेता फरहान अख्तरने अमृताला खडे बोल सुनावले होते.

Story img Loader