तालिबानमधील धर्माध शक्तींच्या विरोधात लढा देऊन तेथील मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या मलाला युसुफझाई यांना नुकतेच शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले. मलाला यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन ‘बिन्दास’ वाहिनीने अशा प्रकारच्या लढय़ावरचे एक कथानकच आपल्या ‘हल्ला बोल’ या शोच्या नव्या पर्वामध्ये सादर केले आहे. आपल्या शिक्षणासाठी आणि स्वातंत्र्यासाठी तालिबान्यांच्याही विरोधामध्ये खंबीरपणे उभे राहून आपल्या परिसरातील तरुणींना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी मलाला यांनी दिलेल्या लढय़ाची दखल संपूर्ण जगाने घेतली. तिच्या या लढय़ावर आधारित सना या मुलीची कथा ‘हल्ला बोल’च्या नवीन पर्वाच्या पहिल्या भागामध्ये दाखवणार आहेत. ‘आपल्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी मुलींनी समाजाविरुद्ध दिलेला लढा’ या संकल्पनेवर ‘हल्ला बोल’चे नवे पर्व आधारित आहे. मलालाची कथा या संकल्पनेला साजेशी असल्याने पहिल्याच भागामध्ये तिचे कथानक सादर करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. एका गावात राहणारी सना अभ्यासामध्ये हुशार असते. एका यशस्वी कारकिर्दीची स्वप्न पाहणाऱ्या सनावर तिच्या घरच्यांचे बारीक लक्ष असते. कारण, कारकीर्द घडवण्याच्या नादापायी सनाची मोठी बहीण घरातून पळून गेलेली असते. त्यातच गावातील एक राजकीय नेता मुलींच्या मोबाइल वापरण्यावर बंदी आणतो. त्या वेळी मात्र या निर्णयाविरुद्ध सना बंड पुकारते. पण आपली मुलगी राजकीय नेत्याच्या विरोधात ठाकली आहे, हे कळल्यावर तिचे वडील आणि घरचे तिला तिच्या या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. या सर्व परिस्थितीमध्ये तिने दिलेला लढा यावर या भागाचे कथानक अवलंबून आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malala yousafzai story on small screen