मल्याळम अभिनेता निविन पॉली नुकताच दुबईहून भारतात परतला. तो त्याच्या कुटुंबासह विमानतळावर स्पॉट झाला. पण, त्याला पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय. त्याचं कारण म्हणजे निविनचं वजन होयं. त्याचे फोटो पाहिल्यानंतर निविने वजन खूप कमी केल्याचं दिसून आलंय आणि तो आधीपेक्षा खूपच तंदुरुस्त दिसत आहे.
वाढत्या वजनामुळे निविनला इंटरनेटवर सतत बॉडी शेमिंग केले जात होते. ‘नजंदुकालुदे नट्टील ओरिदवेला’ आणि ‘हे ज्युद’ यासारख्या चित्रपटांतील भूमिकांसाठी त्याने वजन वाढवलं होतं. पण आता जवळपास पाच वर्ष झाली, त्याने वजन कमी केल नव्हतं. त्याने वाढलेल्या वजनासह काही चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
करोनानंतरच्या काळात निविन फारशा चित्रपटांमध्ये दिसला नाही, त्यामुळे त्याचं वजन त्यास कारणीभूत असल्याचंही म्हटलं जात होतं. तसेच त्याने ज्या चित्रपटांमध्ये काम केलं, तेही फ्लॉप झाले होते. त्याचा शेवटचा चित्रपट ‘सॅटर्डे नाईट’ बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला होता. त्यानंतर आता निविन नवीन लूकमुळे चर्चेत आहे. नवीन वर्षात वजन कमी करून नव्या लूकसह नव्या जोमाने निविन चित्रपटांमध्ये दिसणार असं त्याच्या फोटोंवरून दिसतंय.
काही महिन्यांपूर्वी निविन पॉलीने ‘येझू कदल येझू मलाई’ या तमिळ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. या चित्रपटाच्या माध्यमातून पाच वर्षांनी निविन पुन्हा एकदा तमिळ चित्रपटात दिसणार आहे.