दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मल्याळम चित्रपट आणि टीव्ही अभिनेत्री अपर्णा पी नायरचं निधन झालं आहे. ती गुरुवारी तिरुअनंतपुरममधील करमना येथील तिच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. गुरुवारी सायंकाळी अपर्णा गळफास लावलेली दिसली, त्यानंतर तिला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. ती ३३ वर्षांची होती.
पोलिसांनी सांगितलं की तिला दाखल करण्यात आलेल्या खासगी रुग्णालयातून त्यांना या घटनेची माहिती देण्यात आली होती. “आम्हाला रुग्णालयाकडून माहिती मिळाली आणि अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे,” असं एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं. दरम्यान, ही आत्महत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.
‘मनोरमा’ने दिलेल्या वृत्तानुसार, करमना पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. अपर्णा ‘चंदनमाळा’, ‘आत्मसखी’, ‘मैथिली वेंदुम वरुम’ आणि ‘देवस्पर्शम’ यांसारख्या टीव्ही शोसाठी ओळखली जाते. तिने ‘मेघातीर्थम’, ‘मुथुगौ’, ‘आचायंस’, कोडथी समक्षम बालन वकील आणि ‘कल्की’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलं होतं. अपर्णाच्या पश्चात पती आणि दोन मुलं आहेत.
दरम्यान, अपर्णाच्या निधनाची बातमी कळताच सोशल मीडियावर चाहते श्रद्धांजली वाहत आहेत. तिने आतापर्यंत अनेक सुपरहिट मालिका व चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या होत्या. अवघ्या ३३ व्या वर्षी तिचं निधन झालं आहे. मल्याळम इंडस्ट्रीतही तिच्या निधनावर शोक व्यक्त केला जात आहे.