लोकप्रिय मल्याळम चित्रपट आणि टीव्ही अभिनेत्री अपर्णा पी नायरच्या निधनाची बातमी समोर आली आहे. ती गुरुवारी तिरुअनंतपुरममधील करमना येथील तिच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. अपर्णाच्या निधनानंतर तिने केलेली शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत आली आहे.
राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली प्रसिद्ध अभिनेत्री, पोलीस म्हणाले…
गुरुवारी सायंकाळी अपर्णा घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली, नंतर तिला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. ती ३३ वर्षांची होती. अपर्णाच्या पश्चात पती आणि दोन अपत्ये आहेत. तिने निधनाआधी केलेल्या तिच्या अखेरच्या पोस्टमध्ये तिची मुलगी दिसत आहे.
मृत्यूपूर्वी अपर्णा नायरने तिच्या लहान मुलीच्या सुंदर फोटोंचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. अभिनेत्रीने बॅकग्राउंडमध्ये एक गाणही लावलं होतं. तिने कॅप्शनमध्ये ‘माझी लाडकी मुलगी’ असं लिहिलं होतं. अपर्णाचं इन्स्टाग्राम पाहिल्यास त्यावर तिचे पती व कुटुंबाबरोबरचे आनंदी फोटो आहेत. अशातच अचानक तिच्या मृत्यूची बातमी आल्याने सर्वांना धक्का बसला आहे.
‘मनोरमा’ने दिलेल्या वृत्तानुसार, करमना पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. तिने आतापर्यंत अनेक सुपरहिट मालिका व चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या होत्या. अपर्णा ‘चंदनमाळा’, ‘आत्मसखी’, ‘मैथिली वेंदुम वरुम’ आणि ‘देवस्पर्शम’ यांसारख्या टीव्ही शोसाठी ओळखली जाते. तिने ‘मेघातीर्थम’, ‘मुथुगौ’, ‘आचायंस’, कोडथी समक्षम बालन वकील आणि ‘कल्की’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलं होतं.