मल्याळम सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अवघ्या २४ व्या वर्षी एका अभिनेत्रीचे निधन झाले आहे. लक्ष्मीका सजीवन असे या अभिनेत्रीचे नाव आहे. तिच्या निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. लक्ष्मीका ही उत्तम अभिनेत्री होती, तिने कमी वयात आपल्या अभिनयाने नाव कमावलं होतं.
लक्ष्मीका सजीवनचे शुक्रवारी संयुक्त अरब अमिराती येथील शारजाहमध्ये निधन झाले. न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. ती शारजाहमधील एका बँकेत काम करत होती. तिच्या निधनाची बातमी कळताच चाहते सोशल मीडियावर पोस्ट करून तिला श्रद्धांजली वाहत आहेत. अनेकजण तिच्या आठवणींना उजाळा देत आहेत. अवघ्या २४ व्या वर्षी लक्ष्मीकाचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
लक्ष्मीकाने मल्याळम शॉर्ट फिल्म ‘काक्का’ मध्ये पंचमीची मुख्य भूमिका केली होती. यामधील तिच्या कामासाठी प्रेक्षक आणि समीक्षकांनी तिचे खूप कौतुक केले होते. तसेच तिने ‘पुळयम्मा’, ‘पंचवर्नाथथा’, ‘सौदी वेल्लाक्का’, ‘उयारे’, ‘ओरू कुट्टनादन ब्लॉग’, ‘ओरु यमंदन प्रेमकथा’ आणि ‘नित्याहरिथा नायगन’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती शेवटची ‘कून’ नावाच्या चित्रपटात झळकली होती. हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘काक्का’ या शॉर्ट फिल्ममध्ये लक्ष्मीका सजीवनने एका दुर्लक्षित मुलीची भूमिका साकारली होती.