प्रसिद्ध मल्याळम लेखक सतीश बाबू यांचं २४ नोव्हेंबर रोजी निधन झालं. सतीश बाबू यांनी वयाच्या ५९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी तिरुवनंतपुरममधील त्यांच्या घरी संशयास्पद अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला. २४ नोव्हेंबरला पत्नी माहेरी गेल्यानंतर ते घरात एकटेच होते. ते कोणाचाच फोन उचलत नसल्याने घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्यानंतर ते मृतावस्थेत आढळले. मात्र त्यांच्या निधनाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

वंचियूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूचं खरं कारण पोस्ट मॉर्टम झाल्यानंतरच समजू शकणार आहे. सतीश बाबू यांच्या मृत्यूची अनैसर्गिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली असली तरीही त्यांचा मृत्यू संशयास्पदरित्या झाल्याचं प्रथमदर्शनी दिसत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यांचा मृतदेह सरकारी मेडिकल कॉलेज रुग्णालय, तिरुवनंतपुरमच्या शवागरात ठेवण्यात आला आहे. आज त्यांच्या मृतदेहाचं पोस्ट मॉर्टेम करण्यात येणार आहे.

आणखी वाचा- “माझी पहिली आई…” दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सूम यांच्या निधनानंतर सचिन पिळगावकरांची पोस्ट

कोण होते सतीश बाबू?
सतीश बाबू यांचा जन्म पलक्कडच्या पथिरिपाला येथे झाला होता. त्यांनी आपलं शिक्षण कान्हागढ आणि पयन्नूरमधून पूर्ण केलं. शालेय वयापासूनच ते साहित्यिक उपक्रमांमध्ये सहभागी होत असत. ते एक प्रसिद्ध लघुकथा लेखक आणि कादंबरीकार होते. २०१२ मध्ये सतीश बाबू यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

याशिवाय, त्यांनी केरळच्या सांस्कृतिक विभागांतर्गत भारत भवन या संस्थेचे सदस्य सचिव म्हणूनही काम केलं होतं. ते अनेक कादंबऱ्यांचे लेखकही आहेत. या कादंबऱ्यांमध्ये ‘मन्नू’, ‘देवापुरा’, ‘मांजा सूर्यांते नलुकल’ आणि ‘कुडामणिकल किलुंगिया रविल’ यांचा समावेश आहे. त्यांनी मलायत्तूर पुरस्कार आणि थोपपिल रवी पुरस्कारासह अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

Story img Loader