‘मालेगाव का सुपरमॅन’, ‘मालेगाव के शोले’, ‘मालेगाव का करण अर्जुन’, ‘मालेगाव का गजनी’ अशी नावे ऐकली तर कुतूहल जागे व्हावे, एवढी ओळख मालेगावात तयार झालेल्या या मिनीबजेट चित्रपटांनी नक्कीच निर्माण केली आहे. हौसेला मोल नसते, असे म्हणतात. त्यामुळे आपली चित्रपट बनवण्याची हौस भागवण्यासाठी इथल्या मंडळींनी पदरमोड करीत एकेक पै जमवली आणि त्यातून मग हॉलीवूडचा सुपरमॅन मालेगावात अवतरला तर कधी सिप्पींच्या रामगढमधील शोले मालेगावात अवतरले. या चित्रपटांचे कौतुक झाले, मालेगावच्या हीरोंना वाहवाही मिळाली. पण, एखाद्या चित्रपट उद्योगाप्रमाणे त्यांचे हे प्रयत्न विस्तारले मात्र नाहीत. आता मात्र आपली ही हौस जाणीवपूर्वक व्यवसाय म्हणून वाढवण्याचा निर्धार मालेगावातील चित्रपटकर्मीनी केला असून ‘मालेगाव में गडबड घोटाला’ हा चित्रपट पहिल्यांदाच ‘यूएफओ’द्वारे एकाच वेळी देशभर प्रदर्शित केला जाणार आहे.
‘मालेगावात यापूर्वी आम्ही चित्रपट करीत होतो ते हौसेपोटी. एकमेकांची मदत घेऊन पाच ते सहा लाख गोळा करायचे. कोणीतरी एकाने कथा लिहायची. मग स्थानिक कलाकारांना घेऊन चित्रपट बनवायचे. ते इथल्याच थिएटरमध्ये प्रदर्शित करायचे. त्यातून एक ते दोन लाखांचा गल्ला जमायचा. उरलेल्या तीन-चार लाखांचे काय? मग स्थानिक केबलवाल्यांना सॅटेलाइट हक्क विकून काही पैसे यायचे. पण, हौशीच्या या जमाखर्चात नुकसानच जास्त होते,’ अशी माहिती चित्रपट दिग्दर्शक अन्वर शेख यांनी दिली. अन्वरने याआधी मालेगावात काही चित्रपट दिग्दर्शित केले होते. त्यामुळे दिग्दर्शनाचा अनुभव गाठीशी असला तरी मालेगावापुरतीच आपल्या चित्रपटाची ओळख राहू नये, ही त्यांची इच्छा होती. मग निर्माते म्हणून मालेगावातीलच इरफान शेख, आलिम शेख पुढे आले. त्यांच्या ‘ए टू झी’ बॅनरखाली ‘मालेगाव में गडबड घोटाला’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून त्यात हेमंत बिर्जे या हिंदीतील कलाकारासह मालेगावचा प्रसिद्ध अभिनेता आसिफ अलबेला, चित्रपटाचे सहनिर्माते एस. नझीम यांच्या मुख्य भूमिका आहेत, असे अन्वर शेख यांनी सांगितले. २५ लाख रुपये खर्चून बनवण्यात आलेला हा मालेगावातील पहिला बिग बजेट चित्रपट ठरला आहे.
मालेगावातील चित्रपटांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवायची असेल तर निर्मिती, कलाकार, तंत्रज्ञ सगळ्याच बाबतीत बदल करायला हवेत हे जाणून या मंडळींना २५ लाखाच्या बजेटचा धोका पत्करला. हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित व्हावा यासाठी चार महिने आपण भटकत होतो. पण, इतक्या छोटय़ा बजेटचे चित्रपट आम्ही प्रदर्शित करीत नाही, असे सांगून वितरकांनी आपल्याला वाटेला लावले होते, असे अन्वर यांनी सांगितले. अखेर मॅक एंटरप्रायझेस या चित्रपट वितरण कंपनीने त्यांच्या चित्रपटात रस घेतला. मात्र, छोटय़ा प्रमाणावर चित्रपट करीत असताना ते सेन्सॉर केले जात नव्हते, नोंदणी होत नव्हती, प्रॉडक्शन हाऊसचा खर्च नव्हता. आता हा सगळा खर्च रीतसर केला असून केवळ यूएफओ प्रणालीद्वारे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सव्वालाख रुपये खर्च केल्याची माहिती त्यांनी दिली. ‘या चित्रपटाला देशभर यश मिळाले तर आमच्या हौसेला व्यवसायाचे स्वरूप देण्यासाठी आम्हाला बळ मिळेल,’ अशी आशा मालेगावातील या चित्रपटकर्मीनी व्यक्त केली आहे.
मालेगावचा चित्रपट देशभर झळकणार
‘मालेगाव का सुपरमॅन’, ‘मालेगाव के शोले’, ‘मालेगाव का करण अर्जुन’, ‘मालेगाव का गजनी’ अशी नावे ऐकली तर कुतूहल जागे व्हावे, एवढी ओळख मालेगावात तयार झालेल्या या मिनीबजेट चित्रपटांनी नक्कीच निर्माण केली आहे. हौसेला मोल नसते, असे म्हणतात. त्यामुळे आपली चित्रपट बनवण्याची हौस भागवण्यासाठी इथल्या मंडळींनी पदरमोड करीत एकेक पै जमवली आणि त्यातून मग हॉलीवूडचा सुपरमॅन मालेगावात अवतरला तर कधी सिप्पींच्या रामगढमधील शोले मालेगावात अवतरले.
आणखी वाचा
First published on: 18-06-2013 at 05:05 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malegaon movies released in country