मल्लिका शेरावत बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सध्या मल्लिका तिचा आगामी चित्रपट ‘आरके/आरके’मुळे बरीच चर्चेत आहे. याशिवाय चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी तिने केलेल्या बोल्ड वक्तव्यांचीही सध्या सोशल मीडियावर चर्चा होताना दिसतेय. आताही नुकत्याच एका मुलाखतीमध्ये मल्लिकाने असं काही विधान केलं आहे की त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. मल्लिकाच्या मते भारतीय पुरुषांनी तिला खूप प्रेम दिलं आहे. मात्र महिलांच्या बाबतीत या उलट घडलं.
बोल्ड सीन केल्यामुळे आपल्याबद्दल नेहमीच एक विशिष्ट प्रकारचं मत तयार केलं गेलं असं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मल्लिका शेरावतने म्हटलं आहे. ती म्हणाली, “माझं ग्लॅमर प्रेक्षकांसाठी जास्तच शानदार होतं. मी ‘मर्डर’मध्ये बिकिनी घातली होती आणि त्याआधी कोणत्याच अभिनेत्रीने असं केलं नव्हतं. मी त्यावेळी खूपच बिनधास्त होते आणि माझ्याकडे बिकिनीसाठी उत्तम फिगर आहे हेच माझ्या डोक्यात होतं.”
आणखी वाचा- “दीपिका पदुकोणने ‘गहराइयां’मध्ये केलं ते मी १५ वर्षांपूर्वीच…” मल्लिका शेरावतचा जबरदस्त टोला
मल्लिका पुढे म्हणाली, “तुम्हाला काय वाटतं, मी बीचवर साडी नेसणार आहे का? नाही, अर्थातच मी बिकिनी घालेन. मी ते सेलिब्रेट करते. लोकांना हे पचवणं कठीण जातं. विशेषतः महिलांना हे स्वीकारणं सर्वाधिक कठीण गेलं असं मला वाटतं. मला पुरुषांमुळे कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. भारतीय पुरुषांनी मला खूप प्रेम दिलं आहे. पण काही महिला मात्र माझ्याबद्दल खूपच चुकीचे विचार करतात.”
मल्लिका शेरावत लवकरच रजत कपूरच्या ‘आरके/आरके’ चित्रपटातून बॉलिवूड कमबॅक करत आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तिने २००३ मध्ये ‘ख्वाहिश’ चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती महेश भट्ट यांच्या ‘मर्डर’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपट इमरान हाश्मीची मुख्य भूमिका होता. त्यावेळी मल्लिकाच्या बोल्ड लूकची बरीच चर्चा झाली होती आणि तिचा हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर तुफान चालला होता.