मामी’ सिलेक्ट शॉर्ट ऑन आयफोन या महोत्सवात ‘अॅपल आयफोन १६ प्रो मॅक्स’ मोबाइलवर चित्रित करण्यात आलेल्या चार विविध भारतीय भाषांतील लघुपट नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. या महोत्सवात मल्याळम भाषेतील ‘कोवर्ती’, तमिळ भाषेतील ‘सिईंग रेड’, मराठी भाषेतील ‘मंग्या’ आणि हिंदी भाषेतील ‘टिंक्टोरिया’ या वैविध्यपूर्ण चार लघुपटांची मेजवानी प्रेक्षकांनी अनुभवली. यानिमित्ताने, ‘मंग्या’ लघुपटाचे ‘अॅपल आयफोन १६ प्रो मॅक्स’ मोबाइलवर नेमके कसे चित्रीकरण झाले आणि प्रक्रिया कशी होती, यासंदर्भात ‘मंग्या’ लघुपटाचा दिग्दर्शक चाणक्य व्यास यांच्याशी साधलेला हा मनमोकळा संवाद.

आणि अशी कथा सुचली

मी गतवर्षी ‘मंग्या’ लघुपटाची कथा लिहिली होती आणि त्यानंतर लघुपटाच्या अनुषंगाने कथानकाला आकार देण्याचे काम केले. आमची एक श्वान ९ वर्षे आमच्यासोबत राहून मरण पावली. त्यामुळे जेव्हा वर्षानुवर्षे तुमच्याबरोबर राहणाऱ्या पाळीव प्राण्याचे निधन होते, तेव्हा नेमकी काय भावना असते? हे दाखविण्याचा प्रयत्न लघुपटातून केला आहे. तसेच, गेल्या दोन वर्षांत २०२३ आणि २०२४ मध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कुक्कुटवर्गीय पक्ष्यांना ‘बर्ड फ्ल्यू’ची लागण झाल्याचे समोर आले आहे. हे प्रमाण ठाणे – पालघर जिल्ह्यात खूपच आहे. त्यामुळे एकीकडे माणसांची पाळीव प्राण्यांसोबत असलेली ओढ आणि दुसरीकडे ‘बर्ड फ्ल्यू’ने घातलेले थैमान यांची गुंफण घालून दोन्ही बाजू ‘मंग्या’ लघुपटातून दाखविण्याचा प्रयत्न केला, असे चाणक्य व्यास यांनी सांगितले.

‘अॅपल आयफोन’वर चित्रीकरण करणे आव्हानात्मक आहे, मात्र आयफोनमधील ‘सिनेमॅटिक मोड’ आणि ‘अॅक्शन मोड’ या दोन सुंदर फीचर्समुळे तसेच विविध लेन्सचा वापर करता येत असल्यामुळे चित्रीकरण करताना अडथळे निर्माण होत नाहीत. ‘आयफोन’वर चित्रीकरण करण्याचे विविध फायदे आहेत. पारंपरिक कॅमेऱ्याच्या माध्यमातून एकाच दिवशी विविध ठिकाणी चित्रीकरण करणे शक्य नाही. संपूर्ण सेटअप बदलायला वीस मिनिटे लागतात, मात्र आयफोनमुळे दहा मिनिटांच्या आतच सेटअप बदलू शकतो. ‘आयफोन’वर चित्रीकरण करताना विविध ठिकाणी चित्रीकरण करणे सोयीस्कर ठरते आणि वेळ वाचतो. आम्ही एका दिवशी विविध ठिकाणी दहा प्रसंग चित्रित करायचो. आयफोनच्या स्पष्टता आणि स्थिरता या दोन जमेच्या बाजूचा खूप फायदा होतो, असेही चाणक्य व्यास यांनी सांगितले.

नियोजनबद्ध स्टोरेजचे गणित

आमचे एका दिवसाचे चित्रीकरण हे ‘१ टीबी’ स्टोरेजच्या पुढे गेले नाही. आम्ही एकावेळी एकाच आयफोनमधून चित्रीकरण करीत होतो, मात्र आम्हाला चित्रिकरणासाठी चार आयफोन देण्यात आले होते. या आयफोनना कॅमेरा १, कॅमेरा २, कॅमेरा ३ आणि कॅमेरा ४ असे नाव देण्यात आले होते. त्यामुळे आमच्याकडे ‘४ टीबी’ स्टोरेज असायचे. एका आयफोनमधील स्टोरेज भरल्यानंतर आम्ही दुसरा आयफोन चित्रीकरणासाठी घ्यायचो. या दरम्यान इतर आयफोनमधील डेटा लॅपटॉपमध्ये सेव्ह करून ठेवण्याची प्रक्रिया सुरू असायची. त्यामुळे एकावेळी एकाच आयफोनमधून चित्रीकरण करण्यात आलेले आहे, विविध बाजूंचे क्षण टिपण्यासाठी अनेक आयफोनच्या कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

नैसर्गिक आवाजाचे रेकॉर्डिंग आणि ‘अॅक्शन मोड’चा वापर

आम्ही प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन कोंबड्याचा, निसर्गातील पक्षी, वारा आणि विविध गोष्टींचा आवाज रेकॉर्ड केला आणि तो वापरला. बाकी पार्श्वसंगीत हे तयार करण्यात आले आहे. आम्ही मुलगा शेतात धावतानाच्या प्रसंगाचे खेड शिवापूर येथे सकाळी ६ ते ६.३० या वेळेत नैसर्गिक प्रकाशात चित्रीकरण केले. त्याठिकाणी आम्ही व्यवस्थित कॅमेरा बसवून वाईड शॉट’ घेतला. सूर्यप्रकाश असल्यामुळे रिफ्लेक्टर आणि ब्लॉकिंगचा वापर केला. तर घरातील प्रसंग चित्रित करण्यासाठी विद्याुत प्रकाशाचा वापर केला. ‘अॅक्शन मोड’चा वापर केल्यामुळे मोशन शॉट्स व्यवस्थित घेता आले आणि हालचाली असलेले प्रसंग चित्रित करताना कॅमेऱ्याला स्थिरता प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली.

आयफोनमधून चित्रीकरण करीत होतो, तेव्हा लोकांच्या चेहऱ्यावर कुतूहल होते. तुम्ही मोबाईलवर कसे चित्रिकरण करता, असे प्रश्न विचारले गेले. आमच्या कलाकारांनी चित्रपट व मालिकांमध्ये काम केल्यामुळे आयफोनमध्ये कसे चित्रीकरण होईल, याबाबत त्यांनाही साशंकता होती. मात्र चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी लघुपट पाहिला आणि हा जादुई प्रयोग पाहून कलाकारही आश्चर्यचकित झाले. एवढे उत्तम आयफोनमधून चित्रीकरण झाले आहे, असे त्यांनी सांगितले.

मोबाइलवर चित्रीकरण करताना लेन्सचा वापर मर्यादित असतो. आयफोनवर लघुपट चित्रित करताना आयफोनच्या नावीन्यपूर्ण फीचर्सचा वापर करता येतो, त्यामुळे दोघांमध्ये तुलना करू शकत नाही. चित्रपट बनविण्यासाठी कल्पना, सर्जनशीलता, कौशल्य आणि चांगल्या कथानकाची गरज असते, असे सांगतानाच ‘मंग्या’ लघुपटाच्या चित्रिकरणाची प्रक्रिया दीड महिने आणि संकलनाची प्रक्रिया दोन आठवडे चालल्याची तसेच, मॅकबुक प्रोमध्ये ‘अॅडोब प्रिमिअर प्रो’वर संकलन करण्यात आल्याची माहिती चाणक्य व्यास यांनी दिली.