Mammootty Post : हेमा समितीचा अहवाल येऊन पंधरा दिवस झाल्यानंतर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतले लोकप्रिय अभिनेते मामुट्टी यांनी मॉलिवूडमधलं लैंगिक शोषण, महिलांना दिली जाणारी अपमानजनक वागणूक, शरीरसंबंध ठेवण्याची केली जाणारी मागणी या सगळ्यावर भाष्य केलं आहे. मल्याळी चित्रपटसृष्टीतले मेगास्टार अशी ओळख असलेल्या मामुट्टींनी ( Mammootty ) एक पोस्ट लिहून या सगळ्या प्रकरणावर भाष्य केलं आहे.
हेमा समितीचा अहवाल आल्यानंतर काय घडलं?
हेमा समितीचा अहवाल समोर आल्यानंतर मॉलिवूडमधल्या अनेक महिलांनी पुढे येऊन त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली. यामध्ये मेक-अप आर्टिस्ट, सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करणाऱ्या महिला, अभिनेत्री या सगळ्यांचाच समावेश आहे. काम हवं असेल तर निर्माते, अभिनेते, सिनीयर मेक अपमन यांच्यासह शय्यासोबत करावी लागते, त्याशिवाय काम मिळत नाही. तसंच तक्रार केली तर काम मिळणं बंद होतं हा आणि असे अनेक आरोप या दरम्यान झाले आहेत. या अहवालामुळे आणि कलाकारांनी केलेल्या आरोपांमुळे मॉलिवूड हादरलं आहे. याच घटनांबाबत मामुट्टी ( Mammootty ) यांनी एक पोस्ट लिहिली आहे.
मामुट्टींची पोस्ट काय आहे?
सिनेमा हा समाजाचं प्रतिबिंब असतो, ज्या चांगल्या आणि वाईट गोष्टी समाजात घडतात त्याच चित्रपटांमध्येही घडतात. सिनेसृष्टीबाबत लोकांना कायमच आकर्षण असतं त्यामुळे इथे काय घडतं? ती अगदी छोट्यातली छोटी गोष्ट असली तरीही समाजाचं याकडे लक्ष असतं. सिनेसृष्टीत टाचणी पडली तरीही माध्यमांमध्ये, समाजात त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा होते. सिनेमा तयार करणाऱ्या प्रत्येक घटकाने काळजीपूर्वक काम केलं पाहिजे आणि नकोशा वाटतील अशा गोष्टी घडू नयेत यासाठी आवश्यक खबरदारी घेतली पाहिजे.” असं मामुट्टींनी ( Mammootty ) म्हटलं आहे.
अनेक दुर्दैवी गोष्टी घडल्या आहेत
पुढे मामुट्टी म्हणतात, “जस्टिस हेमा समिती सरकारने स्थापन केली आहे. त्यानंतर काही दुर्दैवी आणि सिनेसृष्टीबाबत ऐकायला आवडणार नाहीत अशा गोष्टी समोर आल्या आहेत. या गोष्टींमधून धडा घेऊन पुढे गेलं पाहिजे आणि या गोष्टी घडणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. हेमा समितीच्या अहवालात जे निर्देश आणि सूचना आम्हा कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांना दिल्या आहेत त्यांचं काटेकोर पालन झालं पाहिजे. या सूचना आणि निर्देशांचा मी आदर करतो. मॉलिवूडनेही या निर्देशांचं आणि सूचनांचं पालन केलंच पाहिजे, त्यासाठी कुठल्याही अटी नकोत. दुसरीकडे ज्या काही तक्रारी आल्या आहेत त्यांचा तपास पोलीस करत आहेत. न्यायालय दोषींना योग्य शिक्षा करेल.” असंही मामुट्टींनी ( Mammootty ) म्हटलं आहे.
मल्याळी सिनेसृष्टीत कुठलेही पॉवरग्रुप नाहीत
मामुट्टी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये मॉलिवूडमध्ये कुठलेही पॉवर ग्रुप वगैरे नाहीत असंही स्पष्ट केलं आहे. सिनेमा हे मनोरंजनाचं माध्यम आहे. ज्या गोष्टी घडल्या त्या दुर्दैवी आहेत पण सरतेशेवटी सिनेमा वाचला पाहिजे हीच अपेक्षा आहे असंही मामुट्टींनी म्हटलं आहे.
© IE Online Media Services (P) Ltd