Mammootty reacts on Justice Hema Committee report : जस्टिस हेमा कमिटीच्या अहवालातून मल्याळम सिनेसृष्टीबाबत धक्कादायक खुलासे झाले आहेत. अनेक महिला कलाकारांनी अभिनेते व दिग्दर्शकांवर लैंगिक अत्याचाराचे आणि गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. या संपूर्ण प्रकरणावर मल्याळम सुपरस्टार मामूटी यांनी मौन सोडलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट शेअर केली आहे. मल्याळम सिनेसृष्टीत पॉवरहाऊस ग्रुप नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
हेमा कमिटीच्या अहवालानुसार, मल्याळम सिनेमात एक पॉवरहाऊस ग्रुप आहे, ज्यामध्ये सर्व मोठ्या नावांचा समावेश आहे. कोणत्या अभिनेत्रीला काम द्यायचं ते हा ग्रुप ठरवतो, त्यानुसारच सर्व निर्णय घेतले जातात. या गोष्टी मामूटी यांनी फेटाळल्या आहेत.
“ही पोस्ट मल्याळम सिनेइंडस्ट्रीत (Malayalam Cinema) सध्या सुरू असलेल्या घडामोडींच्या संदर्भात आहे. संघटनात्मक प्रक्रियेनुसार आधी नेतृत्व करणारे बोलतात, नंतर इतर. त्यामुळे त्यांची अधिकृत प्रतिक्रिया आल्यावरच मी बोलायला हवं. सिनेमा हे समाजाचे प्रतिबिंब आहे, समाजातील सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी चित्रपटांमध्ये देखील आहे. फिल्म इंडस्ट्रीकडे समाजाचं लक्ष असतं, त्यामुळे तिथे घडणाऱ्या सगळ्याच गोष्टी मोठ्या चर्चेचा विषय ठरतात. या क्षेत्रात काहीही अनुचित घडू नये यासाठी इथे काम करणाऱ्यांनी सावध राहायला हवं,” असं ते म्हणाले.
“सिनेइंडस्ट्रीचा अभ्यास करून उपाययोजना सुचवण्यासाठी सरकारने २०१७ मध्ये एक दुर्दैवी आणि गैरप्रकार घडल्यानंतर जस्टिस हेमा कमिटीची स्थापना केली होती. हेमा कमिटीच्या अहवालातील शिफारसींचे मी मनापासून स्वागत आणि समर्थन करतो. आता वेळ आली आहे की चित्रपटसृष्टीतील सर्व संघटनांनी एकत्र येऊन त्याची अंमलबजावणी करावी. ज्या तक्रारी आल्या आहेत, त्यांचा पोलीस तपास सुरू आहे. जस्टिस हेमा कमिटीचा अहवाल न्यायालयासमोर आहे. पोलिसांनी प्रामाणिकपणे तपास करावा आणि शिक्षा कोर्टाला ठरवू द्यावी,” असं मामूटी म्हणाले.
निक्कीमुळे अरबाज पटेलचं ब्रेकअप? गर्लफ्रेंडने नाव घेत केली पोस्ट; म्हणाली, “मला त्याच्याबद्दल…”
“मल्याळम इंडस्ट्रीमध्ये कोणतेही ‘पॉवर ग्रुप’ नाहीत. सिनेमा ही अशी जागा नाही जिथे अशा गोष्टी असू शकतात. अहवालात नमूद केलेल्या प्रॅक्टिकल शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी आणि कायदेशीर अडथळे असल्यास आवश्यक कायदा तयार करण्यास यावा. महत्त्वाचं म्हणजे इंडस्ट्री टिकली पाहिजे,” असं ते पोस्टमध्ये म्हणाले.