बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने शाहरुखच्या चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं असलं तरी या चित्रपटातील ‘बेकारार करके हमे’ हे गाणं अनेकांना भावलं आहे. शाहरुख खानने क्लासिक गाण्यावर भन्नाट डान्स केल्याने या चित्रपटातील मेट्रो सीन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान, कोरिओग्राफर अनमोल खत्री याने नागपूर मेट्रोत ‘बेकरार करके हमे’चा सीन रिक्रिएट केला आहे. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. नागपूर मेट्रोत अनमोलने एसआरकेच्या स्टेप्स कॉपी करत आयकॉनिक गाण्यावर डान्स केला. अनमोलने शाहरुखप्रमाणे हुबेहूब डान्स केल्याने हा व्हिडीओ आणखी वेधक ठरत आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी अनमोलचं तोंडभरून कौतुक केलं आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने “हा डान्स व्हिडीओ पाहून शाहरुख खानही लाजेल” अशी कमेंट केली आहे. तर काहींनी व्हिडीओला मजेशीर कॅप्शन देत हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.