टॉलिवूडमधील अभिनेत्री अरुणिमा घोष हिला एक चाहत्याने हैराण केले होते. गेल्या दोन वर्षापासून तो चाहता तिला प्रचंड त्रास देत होता. विशेष म्हणजे त्याने तिला तीन वेळा जीवे मारण्याची धमकीही दिली होती. मात्र अखेरीस पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याने यापूर्वीही दोनवेळा तुरुंगवास भोगला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अरुणिमा घोष हिने याबाबत फार पूर्वीच तक्रार दाखल केली होती. गेल्या दोन वर्षांपासून एक व्यक्ती तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड त्रास देत होता. तो अरुणिमाला शिवीगाळ करायचा. तसेच आतापर्यंत त्याने तीन वेळा तिला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी त्याला सर्व्हे पार्क परिसरातून अटक केली.

कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुणिमाने या आरोपीविरुद्ध बलात्कार आणि खुनाच्या धमक्यांबाबत तक्रार दाखल केली आहे. अटक केलेला हा आरोपी गेल्या दोन वर्षांपासून तिचा छळ करत होता. तो तिला सतत जीवे मारण्याची धमकी देत असे. त्यासोबतच अॅसिड हल्ला करण्याची धमकी देणे, अश्लील शेरेबाजी करणे, असा आरोपही तिने केला आहे. यापूर्वी याच गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला अटक होण्याची ही तिसरी वेळ असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुकेश साव याला अटक करण्यात आली आहे. तो सर्वे पार्कचा रहिवासी आहे. सोशल मीडिया साइट्सवर अभिनेत्रीला धमकावल्याबद्दल त्याला यापूर्वी दोनदा 11 आणि 8 दिवसांसाठी तुरुंगात टाकण्यात आले होते.

यापूर्वीही अनेकदा सेलिब्रिटींना चाहत्यांकडून धमक्या देण्याचे प्रकरण समोर आलं होतं. यापूर्वी अनेकदा अनेक अभिनेते, अभिनेत्री यांना चाहत्यांच्या त्रासामुळे सामोरी जावं लागलं होतं. अशाप्रकारे मानसिकरित्या त्रास देणाऱ्यांना लगेचच अटक व्हायला हवी, असे मत अनेकजण व्यक्त करत आहेत.

Story img Loader