मराठी सिनेसृष्टीत दिग्दर्शकांची एक नवी पिढी समोर येत असून परदेशातून फिल्म मेकिंगचे शिक्षण घेतलेले काही दिग्दर्शक मराठीमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यात आणखी एका दिग्दर्शकाची भर पडणार आहे. मराठी रंगभूमी आणि सिनेमांमधून सतत आपल्या भेटीस येणारी अभिनेत्री मनवा नाईक आता दिग्दर्शनाच्या वाटेवर आली आहे. ‘व्हिडिओ पॅलेस’ आणि एआरडी एन्टरटेन्मेंट’ व ‘स्ट्रॉबेरी पिक्चर्स’ प्रस्तुत ‘पोर बाजार’ या सिनेमाचे दिग्दर्शन अभिनेत्री मनवा नाईक हिने केले आहे. या सिनेमाच्या माध्यमातून ती चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करीत आहे.
फोटो गॅलरी: ‘पोर बाजार’ फर्स्ट लूक लाँच
रंगभूमी आणि सिनेमांमधून आपल्या अभिनयाची दमदार छाप पाडल्यानंतर आता अभिनेत्री मनवा नाईक सिनेमा दिग्दर्शनाच्या नव्या इनिंगला सुरूवात करीत आहे. याआधी काही नाटकांसाठी मनवाने प्रॉडक्शन संदर्भात कामे केली होती. तिने न्य़ूयॉर्क फिल्म अकॅडमी मधून फिल्ममेकिंगचे रितसर शिक्षणही पूर्ण केले. मोठ्या पडद्यावरील आपल्या अदाकारीने प्रेक्षकांचे प्रत्यक्ष मनोरंजन केल्यानंतर आता मनवा पडद्यामागून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. ‘पोर बाजार’ हा एक धमाल सिनेमा असून यात मराठीतील तगडी स्टारकास्ट बघायला मिळेल. ‘पोर बाजार’ ही कथा पाच तरूणांची…अजय, मंजिरी, समर, विशाल आणि रागिनी…कॉलेजमध्ये शिकणारी ही तरूण गॅंग नेहमीच लेक्चर बंक करून धमाल मस्ती करत असतात. अचानक असेच एकदा लेक्चर बंक करून ते एका घरात शिरतात आणि सुरू होतो एक अ‍ॅडव्हेंचर प्रवास…या धमाल कथानकात अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री सई ताम्हणकर या दमदार जोडी सोबतच चित्रा नवाथे, स्वानंद किरकिरे, प्राजक्ता दिघे, कमलाकर नाडकर्णी, शंतनु गव्हाणे, विकास पाटील, अनुराग वोरलीकर, स्वारंगी मराठे, सत्या मांजरेकर, सखील परचुरे, धर्मज जोशी आणि मृणाल पंतवैद्य यांच्याही महत्वाच्या भूमिका बघायला मिळणार आहेत. सत्या मांजरेकर हा दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा मुलगा असून सखील परचुरे ही अतुल आणि सोनिया परचुरे यांची मुलगी आहे. तर धर्मज जोशी हा मराठी व हिंदी सिनेमांमधील प्रसिद्ध कलाकार मनोज जोशी यांचा मुलगा आहे.
धमाल स्टारकास्ट आणि धमाल कथानक असलेल्या ‘पोर बाजार’ ची पटकथा आणि संवाद पराग कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. तर गुरू ठाकूर, श्रीरंग गोडबोले आणि मंदार चोलकर यांनी लिहिलेल्या गीतांना शैलेंद्र बर्वे यांनी संगीत दिले आहे. या सिनेमाच्या टायटल सॉंगसाठी प्रसिद्ध सिनेमटोग्राफर महेश लिमये यांनी छायाचित्रण केले असून नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव आणि सोनिया परचुरेने केले आहे. लवकरच हा धमाल सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा