बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदीचा आज वाढदिवस. मंदिरा सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. तिच्या लुकपासून ते फॅशन आणि फिटनेसपर्यंत सर्वच गोष्टींची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होताना दिसते. खरं तर मंदिरा हेअर कट तिला नेहमीच सर्वांपेक्षा वेगळा लुक देतो. या हेअरकटमुळे ती स्टायलिश दिसते. पण एक वेळ अशी देखील होती. जेव्हा मंदिराचा हाच हेअरकट तिच्यासाठी डोकेदुखी ठरू लागला होता. तिच्या छोट्या केसांमुळे इंडस्ट्रीमध्ये तिला कशी वागणूक मिळाली याचा खुलासा तिने एका मुलाखतीत केला.

मंदिरा बेदीनं तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात १९९४ साली टीव्ही मालिका ‘शांती’च्या माध्यमातून केली. त्यावेळी तिला लांब कुरळ्या केसांमध्ये प्रेक्षकांनी पाहिलं होतं. त्यानंतर तिनं ‘सास भी कभी बहू थी’ (२००१-२००३) आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ (१९९५) या मालिकांमध्ये काम केलं ज्यात तिच्या लांबसडक केसांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. पण त्यानंतर मंदिरानं अचानक एका रिअलिटी शोच्या वेळी केस कापून टाकले. तेव्हापासून ते नेहमीच छोट्या केसांमध्ये दिसतेय. याचा किस्सा तिने एका मुलाखतीत शेअर केला होता.

आणखी वाचा- “एकही नेता सामान्य जनतेच्या समस्येबद्दल…” प्रसिद्ध अभिनेता संदीप पाठकचं ट्वीट चर्चेत

एका मुलाखतीत आपल्या लुकबद्दल बोलताना मंदिरा म्हणाली, “मी जेव्हा माझे लांबसडक केस कापण्याचा निर्णय घेतला तेव्हा केस कापणाऱ्यानं मला विचारलं, ‘तुम्हाला नक्की एवढे केस कापायचे आहेत ना?’ माझा निर्णय झाला होता. कारण मी स्ट्रेटनिंग आणि कर्लिंग करून माझ्या लांब केसांना कंटाळले होते. जेव्हा त्यांनी मला विचारलं की तुला खरंच एवढे छोटे केस ठेवायचेत का? तेव्हा मी होकार दिला.”

आणखी वाचा- Alia Ranbir Wedding : आलियाच्या मंगळसूत्राची सगळीकडे चर्चा, डिझाइनचं रणबीरशी आहे खास कनेक्शन!

मंदिरा पुढे म्हणाली, “त्यावेळी त्या सलूनमधील हेअरड्रेसरनं माझे केस खांद्यापर्यंत कापले आणि म्हणाला तुला यापेक्षा कमी करायचे असतील तर उद्या ये. मी दुसऱ्या दिवशी ते सलून उघडण्याआधीच तिथे पोहोचले आणि त्याला सांगितलं हो मला माझे केस आणखी लहान करायचेत. तेव्हापासून मागची १२ वर्षं माझे केस एवढे छोटे आहेत.”

या मुलाखतीत मंदिरानं तिच्या केसांमुळे इंडस्ट्रीमध्ये कशी वागणूक मिळाली याचा अनुभव सांगितला. ती म्हणाली, “जेव्हा मी माझे केस कापून खूप छोटे केले तेव्हा मला नकारात्मक भूमिकांच्या ऑफर मिळू लागल्या होत्या. हे माझ्यासाठी धक्कादायक होतं. पण मला माझे छोटे केस आवडतात आणि मी तोपर्यंत केस वाढवणार नाही जोपर्यंत एखाद्या भूमिकेसाठी लांब केसांची डिमांड असणार नाही. एखाद वेळेस अशी ऑफर मिळाल्यास मी केस वाढवण्याचा विचार करेन.”