नवरा आणि बायकोच्या एकमेकांबद्दलच्या असलेल्या अपेक्षा आणि त्यातून होणाऱ्या नात्यांच्या कोंडीचे चित्रण करणाऱ्या ‘मंगलाष्टक वन्समोअर’ या मराठी चित्रपटाचा दूरचित्रवाहिनीवरील प्रीमिअर २२ जून रोजी सायंकाळी सात वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ही जोडी चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे.
सध्याच्या काळात नवरा आणि बायको हे दोघेही नोकरी करणारे असल्याने कार्यालय आणि घरातील कामाची जबाबदारी सांभाळताना दोघांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. धावपळीचे आयुष्य, दैनंदिन ताणतणाव यातून एकमेकांसाठी वेळ काढणे कठीण झाले आहे. यातून आयुष्यात घडणाऱ्या प्रसगांचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे.
सध्याच्या काळात आपण नवनवीन आणि अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरत आहोत. त्यातील नवीन सॉफ्टवेअर आपण अद्ययावत करतो पण आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर आपण आपली नाती अद्ययावत करायला विसरतो. त्यामुळे नात्यात एक साचलेपण येते. ‘मंगलाष्टक वन्समोअर’ हा चित्रपट आपल्याला आपल्या नात्याविषयी नव्याने विचार करायला लावतो, असे अभिनेता स्वप्नील जोशी याने या प्रिमिअरच्या निमित्ताने सांगितले. तर या चित्रपटाविषयी मुक्ता बर्वे म्हणाली की, माणूस म्हणून आपण दररोज बदलत असतो. पण आपल्यात केलेले हे बदल आपल्या नात्यात रुपांतरित करायला आपण विसरतो. त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. नात्यातील हा दुरावा फक्त नवरा व बायकोच्या नात्यात नव्हे तर आई-मुलगी, वडील-मुलगा, बहिण-भाऊ यांच्या नात्यातही येऊ शकतो.
हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी चित्रपटगृहांतून प्रदर्शित झाला होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर स्वप्नील आणि मुक्ताला त्यांच्या ओळखीच्या आणि अनोळखी लोकांकडूनही चित्रपट आवडल्याच्या प्रतिक्रिया मिळाल्या. ‘फेसबुक’वरही प्रतिक्रियांचा पाऊस पडला. चित्रपट पाहून आमचे डोळे उघडले, आमचे तुटू लागलेले नाते तुम्ही वाचविलेत, अशा शब्दांतही प्रेक्षकांनी आपले विचार स्वप्नील आणि मुक्तापर्यंत पोहोचविले होते.
‘मंगलाष्टक वन्समोअर’चा प्रीमियर रविवारी ‘स्टार प्रवाह’वर
नवरा आणि बायकोच्या एकमेकांबद्दलच्या असलेल्या अपेक्षा आणि त्यातून होणाऱ्या नात्यांच्या कोंडीचे चित्रण करणाऱ्या ‘मंगलाष्टक वन्समोअर’ या मराठी चित्रपटाचा दूरचित्रवाहिनीवरील प्रीमिअर २२ जून रोजी सायंकाळी सात वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरून प्रसारित होणार आहे.
First published on: 20-06-2014 at 05:06 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mangalashtak once more