Mangesh Borgaonkar : गेल्या दोन दिवसांपासून जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दलचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक नवविवाहित जोडपं काश्मीरच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये आनंद घेत असतानाचे दिसत आहे. हा व्हिडीओ विनय नरवाल आणि त्यांची पत्नी हिमांशी यांचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. पण हा व्हिडीओ त्यांचा नसून सोशल मीडिया इन्फ्लुएंसर यशिका शर्मा आणि आशिष सहरावत यांचा आहे.

याबद्दल स्वतः यशिका आणि आशिष यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे. यात त्यांनी असं म्हटलं आहे की, “आम्ही जीवंत आहोत, कारण आम्ही त्या हल्ल्यात नव्हतो. पण आमचा व्हिडीओ हल्ल्यात मृत्यू झालेल्या नेव्ही ऑफिसरचा असल्याचा दावा करून कसा व्हायरल केला जात आहे हे आम्हाला माहित नाही. सर्वत्र मीडिया चॅनेलवर आमचं फुटेज दाखवून ते त्या दुःखद घटनेशी जोडलं जात आहे.”

यशिका आणि आशिष यांच्या या व्हिडीओवर प्रसिद्ध मराठी गायकने मंगेश बोरगावरने भाष्य केलं आहे. गायकाने त्या दोघांचा व्हिडीओ स्वत:च्या स्टोरीवर शेअर केला आहे आणि योग्य ती शहानिशा न करता व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांबद्दल संताप व्यक्त केला आहे. यावर मंगेशने असं म्हटलं आहे की, “सबसे तेज म्हणवून घेण्याच्या नादात काय दाखवतील विश्वास नाही. गेल्या दोन दिवसांत समाज म्हणून किती खालच्या थराला गेलोय आपण? डिजिटल मीडियाने तर कळस गाठला आहे. संपूर्ण खात्री करुनच व्यक्त होऊयात. भारतीय म्हणून एकत्र येण्याची हीच योग्य वेळ.”

मंगेश बोरगावकर इन्स्टाग्राम स्टोरी
मंगेश बोरगावकर इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, ‘सारेगमप’मधून उदयास आलेला युवा गायक मंगेश बोरगावकर हा त्याच्या सुमधूर आवाजासाठी ओळखला जातो. त्याने चित्रपट गीते किंवा अल्बममध्ये गाणी गायलं असून तो अनेक गाण्यांचे कार्यक्रमही करतो. आपल्या सुमधुर आवाजाने चर्चेत राहणारा मंगेश सोशल मीडियावरही चांगलाच सक्रीय असतो. सोशल मीडियाद्वारे तो अनेकदा सामाजिक व राजकीय विषयांवर भाष्य करताना दिसतो.

अशातच मंगेशने यशिका आणि आशिष यांच्या व्हिडीओचा चुकीचा वापर झाल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. तसंच ‘समाज म्हणून किती खालच्या थराला गेलोय’ असं म्हणत नाराजीही व्यक्त केली आहे. शिवाय त्याने “भारतीय म्हणून एकत्र येण्याची हीच योग्य वेळ आहे” असं म्हणत आवाहनही केलं आहे.