अभिनेत्री कंगना रणौतचा ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांशी’ हा चित्रपट शुक्रवारी (२५ जानेवारी) प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या माध्यमातून कंगनाने पहिल्यांदाच दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत असून आतापर्यंत या चित्रपटाने ५२ कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे कंगनाचं या क्षेत्रातील पदार्पण यशस्वी ठरत आहे. मात्र चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.त्याचप्रमाणे आतादेखील तसंच काहीस झाल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसापूर्वी चित्रपटाचे अधिकृत दिग्दर्शक क्रिश यांनी कंगनावर कलाकारांचे सीन कापल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता या चित्रपटातील आणखी एका अभिनेत्रीने कंगनावर असाच आरोप केला आहे.
‘मणिकर्णिका’मध्ये अभिनेत्री मिष्ठी चक्रवर्ती मुख्य भूमिकेत असून या चित्रपटातील तिच्या काही सीनवर कात्री लावण्यात आली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मिष्ठीने याविषयी तिची नाराजी व्यक्त केली आहे.
सुभाष घई यांच्या ‘कांची’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या मिष्ठीची ‘मणिकर्णिका’मध्ये एक महत्वाची भूमिका होती. त्यामुळे तिने या चित्रपटासाठी होकार दिला होता. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मिष्ठीच्या अनेक सीनवर कात्री लावण्यात आली होती. हे पाहिल्यानंतर ‘चित्रपटात मी नक्की कुठे आहे ‘? असा संतप्त सवाल मिष्ठीने एका मुलाखतीमध्ये विचारला.
‘प्रथम मी या चित्रपटासाठी नकार दिला होता. माझा नकार मी कमल जैन यांना कळविलादेखील होता. पण तुझ्या वाट्याला महत्वाची भूमिका येणार आहे, असं कमल जैन यांनी मला सांगितलं. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन मी चित्रपटात काम करण्यास तयार झाले. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मला धक्काच बसला’, असं मिष्ठी म्हणाली.
पुढे ती असंही म्हणाली, ‘या चित्रपटात माझे काही साहसदृश्य होते. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ते कुठेही दिसले नाही. जर शेवटच्या वेळी कंगनाच हा चित्रपट दिग्दर्शित करणार असल्याचं मला यापूर्वी समजलं असतं. तर मी हा चित्रपट कधीच स्वीकारला नसता’.
दरम्यान,’ मणिकर्णिका’ प्रदर्शित होण्यापूर्वीही कंगनावर अशाच प्रकारे टीका करण्यात आली होती. कंगना आणि सोनू सूद यांच्यात वाद निर्माण झाले होते. त्यामुळे सोनूने हा चित्रपट अर्ध्यावरच सोडून दिला होता. त्यातच मिष्ठीसोबत झालेल्या या प्रकारानंतर तिनेदेखील सोनूची बाजू घेत त्याला पाठिंबा दिला आहे.