टीव्ही अभिनेता मनिष पॉलचा ‘मिकी वायरस’ हा पहिला बॉलिवूड चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकण्याआधीच अभिषेक शर्माचा २०१० साली आलेला हिट कॉमेडी चित्रपट  ‘तेरे बिन लादेन’ या चित्रपटाच्या रिमेकमधील प्रमुख भूमिका पॉलच्या वाट्याला आली आहे.
३१ वर्षीय पॉल या चित्रपटात एका अनोख्या भूमिकेत दिसणार असून, त्याची ही भूमिका चित्रपटाच्या कथेला एक नवी दिशा देणारी आहे. ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत पॉल म्हणाला की, या चित्रपटात मी जुन्या कलाकारांसमवेत एका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मिकी वायसर चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण होण्याअगोदरच या भूमिकेचा प्रस्ताव माझ्यासमोर आला होता. अभिषेकचा मला फोन आल्यानंतर मी या चित्रपटासाठी ऑडिशन दिले. माझ्या अभिनयाने प्रभावित होऊन त्याने मुख्य भूमिकेसाठीचा प्रस्ताव माझ्या पुढे ठेवला. अलीकडेच मी या चित्रपटासाठीचे शुटींग सुरू केले आहे.
चित्रपटातील अली जफरच्या भूमिकेविषयी विचारले असता याबाबत अधिक काही बोलण्यास पॉलने नकार दिला.  रेडिओ जॉकी म्हणून करिअरची सुरुवात करणा-या पॉलने टीव्ही मालिकांमध्ये काम केले असून, तो एक सफल सूत्रसंचालकसुद्धा राहिला आहे. पॉलला या आधी देखील अनेक चित्रपटांचे प्रस्ताव आले होते, परंतु, पहिल्याच चित्रपटासाठी त्याला एखाद्या चांगल्या भूमिकेची प्रतिक्षा होती. ‘मिकी वायरस’ या पॉलच्या पहिल्या चित्रपटात त्याचे सिक्स पॅक अॅब्स पाहायला मिळणार आहेत. ‘तेरे बिन लादेन’ चित्रपटाचा सिक्वल पुढच्यावर्षी प्रदर्शित होणार आहे.