अभिनेते आणि हिंदी सिनेमाच्या रूपेरी पडद्यावरचे देखणे खलनायक प्राण यांना शुक्रवारी दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय चित्रपटांतील बहुमूल्य योगदानाबद्दल केंद्र सरकारतर्फे हा पुरस्कार दिला जातो. प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याला प्राण उपस्थित राहू शकले नव्हते. म्हणून शुक्रवारी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी प्राण यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार देऊन प्राण यांचा सत्कार केला. ‘मिलन’, ‘मधुमती’, ‘काश्मीर की कली’ सारख्या हिंदी चित्रपटांतील खलनायकाच्या भूमिकांमध्ये ‘प्राण’ ओतणाऱया प्राण यांना पुरस्काराच्या रूपाने ‘सुवर्ण कमळ’, प्रशस्तीपत्रक, दहा लाख रूपये रोख आणि शाल प्रदान करण्यात आली.
वांद्रे येथील पाली हिल परिसरातील प्राण यांच्या घरी जाऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. कुर्ता-पायजमामध्ये व्हिलचेअरवर बसलेल्या ९३ वर्षीय प्राण यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी त्यांची मुलगी पिंकी आणि मुलगा सुनील उपस्थित होते. प्रथमच अशा प्रकारे पुरस्कारविजेत्यांच्या निवासस्थानी जाऊन केंद्रीय मंत्र्यांनी दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला. या प्रसंगी तिवारी म्हणाले की, प्राणसाहेबांना भेटून त्यांचा गौरव करणे ही व्यक्तिश: माझ्यासाठी भाग्याचा क्षण असून भारतीय सिनेमाच्या शताब्दी वर्षांत प्राण यांना हा पुरस्कार दिला जातोय हीसुद्धा गौरवास्पद बाब आहे. प्राण यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्या घरी जाऊन हा पुरस्कार देणे ही आमची जबाबदारी होती. यासाठी मी प्रत्येक एका व्यक्तीचे अभार मानतो, असेही ते म्हणाले.
प्राण यांना हा सन्मान देण्यास उशीर झाला, याबाबत विचारले असता तिवारी म्हणाले, या पुरस्काराच्या नामांकनासाठी एका प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक असते. पुरस्काराबाबत निर्णय घेणारी समिती पुरस्कार देण्याची योग्य वेळ ठरवते. प्राण यांच्या मुलांनी आपल्या वडिलांना मिळालेल्या या पुरस्कारासाठी आनंद व्यक्त केला असून, पिंकी म्हणाली, या प्रसंगी आम्ही एका पार्टीचे आयोजन करून हा क्षण साजरा केला. मागील काही काळापासून खालावलेली प्राण यांची प्रकृती आता ठीक आहे.
जवळजवळ सहा दशकांच्या चित्रपट सृष्टीतील प्रवासात प्राण यांनी ३५० पेक्षा अधिक चित्रपटांत काम केले. ‘मिलन’, ‘मधुमती’, ‘काश्मीर की कली’ आणि ‘उपकार’ सारख्या अनेक चित्रपटात त्यांनी अविस्मरणीय असा अभिनय केला. चित्रपट पडद्यावरील त्याच्या खलनायकी भूमिकेच्या जादूचा प्रभाव एव्हढा होता की, जेव्हा ते लोकप्रियतेच्या शिखरावर होते, तेव्हा अनेकांनी आपल्या मुलांचे नाव ‘प्राण’ असे ठेवणे बंद केले होते. १९६९ ते १९८२ पर्यंत मोठ्या पडद्यावरील त्यांचे राज्य कायम होते.
ज्येष्ठ अभिनेते प्राण यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान
अभिनेते आणि हिंदी सिनेमाच्या रूपेरी पडद्यावरचे देखणे खलनायक प्राण यांना शुक्रवारी दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय चित्रपटांतील बहुमूल्य योगदानाबद्दल केंद्र सरकारतर्फे हा पुरस्कार दिला जातो.
First published on: 10-05-2013 at 05:32 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manish tewari presents dadasaheb phalke award to pran